Sangli Political: कुरघोड्या करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणार; खासदार संजय पाटलांचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Patil

कुरघोड्या करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणार; संजय पाटलांचा इशारा

विटा (सांगली) : मला यशवंत कारखाना चांगला चालवायचा आहे. शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे. केंद्र सरकारच्या योजनेत अडीच लाख लिटरचा इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प मंजूर झाला आहे. सात कोटी शेतकऱ्यांचे देणे आहे, ते देणार आहे. पण या दिरंगाईचे कारण काय? हे शेतकऱ्यांना समजावे ही अपेक्षा आहे. कुरघोड्या करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणार आहे." असा इशारा खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांनी पत्रकार बैठकीत दिला.

हेही वाचा: नुरा नाही खरी कुस्ती; कोरेंच्या टीकेला मंत्री मुश्रीफांचे उत्तर

खासदार पाटील म्हणाले, "यशवंत साखर कारखाना २०१२-१३ साली बँकेने विक्रीस काढला होता. टेंडर भरून २८ कोटी जास्त देऊन हा कारखाना आमच्या संस्थेने घेतला. सेल सर्टिफिकेट व ताबा घेतल्यानंतर आमदारांनी हायकोर्टात केस केली. निकाल त्यांच्या विरुद्ध लागला, नंतर सुप्रीम कोर्टात अपील केले. तेथे काही बाबी लपवून दीड वर्षे घालवले. अॅड. अभिषेक सिंधी यांच्यामार्फत कोर्टाची दिशाभूल केली गेली. तिथेही त्यांचा अपेक्षा भंग झाल्याने पुन्हा हायकोर्टात जाऊन त्यांनी दोन-अडीच वर्षे हा विषय रेंगाळत ठेवला. महिन्यापूर्वी ऑनलाइन कामकाज चालू झाले आणि पंधरा दिवसापूर्वी निकाल लागला.

ज्यावेळी आमदार यशवंत कारखान्याचे प्रमुख होते. त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज फेडू शकत नाही, हे सिद्ध झाल्यावर त्यांनी स्वतः सहकारातला यशवंत कारखाना ठराव करून बँकेला सुपूर्द केला. दुसऱ्या टेंडरमध्ये ३२ कोटी किंमत असताना ५६ कोटी ५१ लाख रुपयांत हा कारखाना विकत घेतला. परंतु आमदार बाबर यांनी नऊ वर्षे हा कारखाना सुरू होऊ नये म्हणून अडचणी आणल्या. सहकारी, मित्र यांच्याकडून अर्थसहाय्य घेत आर्थिक समस्यांतून, खडतर वाटचाल करून संघर्ष करत कारखाना चालविण्याचा प्रयत्न करतो आहे. तरीही निकाल लागल्यावर कुरघोड्या सुरू आहेत.'संग किंवा जंग' या मनस्थितीत मी जगतो. कोणाच्यातरी मागे पुढे करुन नव्हे तर स्वकर्तृत्वावर आणि मतदार, नागरिक व शेतकरी यांच्या पाठबळावर मी इथपर्यंत वाटचाल केली आहे.

बाबरांनी मर्यादा ओलांडली

आपण काही करायचे नाही. आणि दुसऱ्यालाही काही करू द्यायचे नाही अशी भूमिका घेणाऱ्यांनी कारखाना का बंद पडला? काय उलाढाली झाल्या? हे सगळे खोलात जाऊन सगळा कारभार समाजासमोर आणावा लागेल. मिलीजुलीचे राजकारण मी करत नाही. हा संघर्ष शेवटपर्यंत मी तत्वाने करेन. राजकीय जीवनात मर्यादा ओलांडण्याचे काम आमदारांनी केले आहे. ज्यांनी स्वतः बँकेकडे कारखाना सुपूर्द केला, त्यांनीच आता शेतकऱ्यांसाठी कारखाना राहावा असा बनाव करणे योग्य नाही." या शब्दात खासदार पाटील यांनी आमदार बाबर यांच्यावर टीका केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top