
उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे सतत कुठल्यातरी कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. आता खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारताच राऊत थुंकल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. यादरम्यान गद्दारांवर थुंकणं हा हिंदु संस्कृतीचा भाग आहे अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे. इतकेच नाही तर यासाठी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा दाखला देखील दिला आहे.
संजय राऊत म्हणाले की, हे वीर सावरकरांचे हे भक्त आहेत. एकदा वीर सावरकरांना न्यायालयात आणलं होतं. सावरकरांनी पाहिलं की, त्यांची माहिती देणारा बेईमान त्या न्यायालयाच्या कोपऱ्यात उभा असल्याचे त्यांनी पाहिलं. वीर सावरकर त्याच्याकडे बघून थुंकले. इतिहासात नोंद आहे. त्यामुळे बेईमानांवर थुंकणं ही हिंदू संस्कृती, हिंदूत्व याचा एक भाग आहे. संताप व्यक्त करणं आहे. पण मी कोणावरही थुंकलो नाही. पण वीर सावरकरांनी देखील आपला संताप हा बेईमानांवर, देशाच्या गद्दारांवर न्यायालयात थुंकून व्यक्त केला होता.
तुम्ही स्वतःची तुलना सावरकरांशी करत आहात का? असे विचरले असता संजय राऊत म्हणाले की, मी सावरकरांचा भक्त आहे. सावरकर, लोकमान्य टिळक, बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांच्या चांगल्या गोष्टी आम्ही घेत असतो. चिड आणि संताप कशाही प्रकारे व्यक्त होऊ शकते. मी कुठे थुंकलो मला दाखवा. माझ्या दाताचा त्रास होता म्हणून ती कृती झाली असेही राऊतांनी स्पष्ट केलं.
राऊतांची अजित पवारांवर खोचक टीका
या प्रकरणावर अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रत्येकानं तारतम्य ठेवून वागावं असा सल्ला राऊतांना दिला होता. यावर बोलताना राऊतांनी अजित पवारांवर घणाघाती टीका केली. राऊत म्हणाले की, धरणामध्ये **** पेक्षा थुंकणं चांगलं.
संयम तर राखला पाहिजे हे बरोबर आहे. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगतो आहोत, आम्ही पळालो नाही. आम्ही माझ्या पक्षाबरोबर ठामपणे उभे आहोत.आमच्या मनात पक्ष बदलण्याचा किंवा संकटं येत आहेत म्हणून भाजपसोबत सूत जुळवण्याचा मनात विचार येत नाही असं उत्तर संजय राऊतांनी दिलं.
थुंकल्याबद्दल माफी मागणार का? याला देशातील १३० कोटी लोकांना माफी मागावी लागेल कारण लोक कुठेना कुठे थुंकत असतात असेही संजय राऊत म्हणाले. मी राजकीय लोकांची नावे घेतल्यास थुंकलो नाही. तर बेईमानांची नावे घेतल्यास थुंकलो असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.