माझ्या उत्तराने अनेकांची प्रकृती ढासळेल; चंद्रकांत पाटलांच्या विधानावर राऊतांचा टोला l Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

'माझ्या उत्तराने अनेकांची प्रकृती ढासळेल'

मुंबई - भाजपच्या (BJP) जीवावर १८ खासदार निवडून आणणाऱ्यांनी आणि त्यांच्या जीवावर निवडणूक जिंकणाऱ्यांनी देशाच्या राजकारणात जाण्याची स्वप्न पाहू नये. एका खासदाराच्या जोरावर म्हणतात आम्ही देशाच्या राजकारणात जाणार. त्यासाठी देशभर फिरावं लागतं, अशी खोचक टीका भाजपाचे चंद्रकांत पाटील (Chadnrakant Patil) यांनी केली होती. आता त्यांच्या या टीकेवर राऊतांनी तिखट प्रतिक्रीयेत प्रतित्त्युर दिले आहे. चंद्रकांत पाटलांचे विधान इतके सिरियस का घेत आहात? इतक्या गोष्टी सिरियसली घ्यायच्या नाहीत. त्यांनी नैराश्यातून केलेली वक्तव्ये आहेत. माझी उत्तरे ऐकून त्यांना त्रास होईल. त्यांची प्रकृती पाहता मी उत्तर देत नाही. माझ्या उत्तराने अनेकांची प्रकृती ढासळेल, असा पलटवार शिवसेनेच्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

खासदार संजय राऊत म्हणतात, प्रियांका यांना राजकीय घडमोडींबाबत प्रथमच भेटणार आहे. त्यांनी भेटीची इच्छा व्यक्त केली होती. आज संध्याकाळी आमची भेट होणार आहे. मी पक्षाचा शिवसैनिक आहे. उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशानेच मी काम करतो. पण यूपीए प्रश्नी उध्दव ठाकरे हे लवकरच बोलणार आहेत. याप्रकरणी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशीही चर्चा झाली आहे. त्यांना माझ्या आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) भेटीबाबत माहिती आहे. लढाईमधे तेव्हा गटतट नको, तर एकच आघाडी मजबूत हवी. पुढे ते म्हणाले, शरद पवारांच्या उंचीचा नेता देशाच्या राजकारणात आज नाही. आजही देशातील नेते पवारांचा शब्द मानतात हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आम्ही राजकीय चर्चा करतो तेव्हा अनेक विषय असतात.

काय म्हणाले आहेत चंद्रकांत पाटील

उद्धव ठाकरे मातोश्रीमधून कधी बाहेर पडत नाहीत. गेल्या दोन वर्षात एकदाही उद्धवजी मंत्रालयात गेले नाहीत. भाजपच्या जीवावर १८ खासदार निवडून आणणाऱ्यांनी आणि त्यांच्या जीवावर निवडणूक जिंकणाऱ्यांनी देशाच्या राजकारणात जाण्याची स्वप्न पाहू नये. पळवून आणलेल्या खासदार तुमच्या चिन्हावर निवडून आले का? एका खासदाराच्या जोरावर म्हणतात आम्ही देशाच्या राजकारणात जाणार. त्यासाठी देशभर फिरावं लागतं. ते करण्याची यांची तयारी नाही, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.