
महाराष्ट्रात कोणाच्या केसाला धक्का लागत नाही, राऊतांचा राज ठाकरेंना टोला
मुंबई : राज ठाकरेंना (Raj Thackeray) धमकीचं पत्र आलं असून त्यांच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटवून देऊ, असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला होता. त्यावरच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र सुरक्षित आहे. कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही, असं राऊत म्हणाले. (Sanjay Raut on Raj Thackeray)
हेही वाचा: Video : राज ठाकरे, बाळा नांदगावकरांना जीवे मारण्याची धमकी कुणी दिली?
शिवसेना भवनात असे धमक्यांचे पत्र रोज येतात. महाराष्ट्र सुरक्षित आहे. महाराष्ट्रात कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही. लागत असेल तर केंद्रीय सरकार CISF ची सुरक्षा द्यायला समर्थ आहे. ही स्टंटबाजी सोडून द्या. कोणत्याही व्यक्तीच्या जीवाला धोका असेल तर येथील सरकार तुमच्या सुरक्षेसाठी जबाबदार आहे, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, राऊतांनी जितेंद्र नवलानीच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले. तपास यंत्रणांचे काही अधिकारी आणि नवलानी मिळून खंडणीचे रॅकेट कसं चालवतात याबाबत मी माहिती दिली. त्यानंतर महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला जाग आली. मी स्वतः पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर पंतप्रधानांनी सीबीआयकडे हे प्रकरण सोपवलं. त्यानंतर अँटी करप्शन ब्युरोने प्राथमिक तपास पूर्ण केला. त्यांच्या हाती काही पुरावे लागले. त्यामुळे त्यांनी जितेंद्र नवलानी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला. नवलानी देश सोडून पळून गेला असेल, तर कोणीतरी या गटाचे मुख्य सूत्रधार होते. त्यांनी नवलानीला पळून जाण्यास मदत केली आहे का? हे तपासावे लागेल, असंही राऊत म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने राजद्रोहाच्या खटल्याबाबत महत्वाचा निकाल दिला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. पंतप्रधानांना आता कुठंतरी वाटलं की, या कायद्याचा गैरवापर होते. याचा वापर असा सुरू राहिला तर नागरिकांचा असंतोष उफाळून येईल, असं वाटलं असेल. त्यामुळे सरकार पुनर्विचार करण्यास तयार आहे, असंही राऊत म्हणाले. तसेच भारतात श्रीलंकेसारखी परिस्थिती येऊ नये यासाठी देशाच्या समस्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत खालावली आहे. तुम्ही किती दिवसांपर्यं लोकांना भ्रमात ठेवणार आहात? असंही राऊत म्हणाले.
Web Title: Sanjay Raut Reaction On Threaten Letter To Raj Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..