esakal | शिवसेना धमकीला भीक घालत नाही - संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay-Raut

संख्याबळाचा दावा
भाजपने लोकसभेच्या वेळी जे ठरलं होतं ते शिवसेनेला द्यावं अन्‌ सरकार स्थापन करावं. त्यांना जमत नसेल तर जनतेसमोर येऊन त्यांनी सरकार बनवू शकत नाही हे स्पष्ट करावं. मग आम्ही सरकार स्थापन कसं करायचं ते पाहू. आमच्याकडे संख्याबळदेखील आहे, ते आम्ही विधानसभेत सिद्ध करून दाखवू, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

शिवसेना धमकीला भीक घालत नाही - संजय राऊत

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे धमकी व दहशतीचे राजकारण आता चालणार नाही. साम-दाम-दंड-भेद हे सत्ता असताना चालतात. सत्तेची गुर्मी खुर्ची गेल्यावर राहत नाही. शिवसेना अशा ब्लॅकमेलिंग व धमक्‍यांना भीक घालत नाही, अशा आक्रमक शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा हल्लाबोल केला. 

शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेमार्फत बोलण्याचे सर्वाधिकार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिले आहेत. त्यानुसार त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली.
अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवेच, शिवसेनेचाच मुख्यमंत्री सुरुवातीला होणार, हा निर्धार शिवसेनेने कायम ठेवल्याचे राऊत या वेळी म्हणाले. सत्ता स्थापन करण्याची जबाबदारी भाजपची आहे, त्यांनी राज्याला राष्ट्रपती राजवटीकडे नेऊ नये. घटनात्मक पेच निर्माण होईल असे काहीही करू नये.

राष्ट्रपती राजवट लावण्याची भाषा म्हणजे जनतेच्या मताचा अवमान असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. भारतीय जनता पक्ष शिवसेनेसह इतर पक्षांतील आमदारांना फोडणार असल्याचे दावे निव्वळ फोल असल्याचे सांगताना ते म्हणाले, की एकही आमदार फुटणार नाही. ईडी, सीबीआयच्या खेळी आता जुन्या झाल्या आहेत. भाजपच्या अशा धमक्‍या व ब्लॅकमेलिंगला शिवसेना भीक घालत नाही, असे स्पष्ट करताना राऊत म्हणाले, की २०१४ ला फडणवीस यांनी घटनाविरोधी सरकार बनवले होते. या वेळी २०१४ सारखं घटनाविरोधी सरकार चालणार नाही. आता २०१९ ची परिस्थिती वेगळी आहे. आम्ही ते होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.