
सोमय्यांचा 'टॉयलेट' घोटाळा बाहेर काढणार, राऊतांचा इशारा
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) किरीट सोमय्यांविरोधात आक्रमक झाले आहेत. लवकरच किरीट सोमय्यांचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार असून मिरा भाईंदर महापालिकेसह राज्यातील इतर भागात १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त घोटाळा झाला आहे. यामध्ये किरीट सोमय्यांचा सहभाग आहे, असे आरोप संजय राऊतांनी (Sanjay Raut Allegations on Kirit Somaiya) केले आहे.
हेही वाचा: किरीट सोमय्या यांच्याबद्दल केंद्र सरकारकडे विचारणा करणार : वळसे पाटील
लवकरच किरीट सोमय्या या महाशयांचा टॉयलेट घोटाळा काढणार बाहेर आहे. मिरा भाईंदर महापालिका आणि राज्यात इतर ठिकाणी काही कोटींचा टॉयलेट घोटाळा केला आहे. सर्व कागदपत्रं सुपूर्द केली आहेत. युवा प्रतिष्ठान एनजीओद्वारे शेकडो कोटी रुपयांचा टॉयलेट घोटाळा केला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करून हा घोटाळा करण्यात आला आहे. या सर्वांवर देवेंद्र फडणवीसांनी बोलावं, असे संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रभक्ती उफाळून आली आहे. त्यांनी पवारांवर ट्विट केले आहेत. फडणवीसांनी एखादं ट्विट टॉयलेट घोटाळ्यावर करावं. तुम्ही आमच्यावर कितीही फुसके आरोप केले तरी आम्ही मागे हटणार नाही. सत्र न्यायालयाने तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरे द्या. सत्र न्यायालयाने तुमच्यावर बेईमानीचा ठपका ठेवला आहे. तुम्ही पुरावे काय मागताय? राजभवनानं सांगितलं की पैसे जमा झाले नाहीत. लोकांची दिशाभूल करू नका. विक्रांतसारखा टॉयलेट घोटाळा देखील महाराष्ट्रात दुर्गंधी निर्माण करणार आहे, असं राऊत म्हणाले.
किरीट सोमय्यांची तुलना दाऊदसोबत -
किरीट सोमय्या आज ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार आहे. त्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, पाकिस्तानात दाऊद इब्राहीम बसला आणि भारतावर आरोप केले तर कोण ऐकणार आहे. जसं दाऊदने दहशतवादावर बोलू नये, तसं स्वतः देशपातळीवरील घोटाळ्यात आरोपी आहेत त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करू नये, असं संजय राऊत म्हणाले.
'न्यायव्यवस्थेवर कोणाचा दबाव?'
राज्यातील भाजपचे आमदार संजय कुटे यांनी न्यायव्यवस्थेबाबत एक व्यक्तव्य केलं होतं. ज्या गोष्टी आम्ही पोलिस आणि प्रशासनाकडून करून घेऊ शकत नाही ते न्यायालयाकडून करून घेऊ शकतो. न्यायालयात आमचं वजन आहे, असं संजय कुटे म्हणाले. भाजपच्या काही लोकांना सतत दिलासा मिळतोय. दिशा सालियान प्रकरण, मुंबई बँक ते आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्यातील आरोपीपर्यंत सर्वांना दिलासा मिळत आहे. न्यायव्यवस्थेवर कोणाचा दबाव आहे का? दिलासा देण्यासाठी न्यायाव्यवस्थेत विशेष लोक बसविण्यात आले आहे का? हे असंच सुरू राहिलं तर देशासाठी धोकादायक आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
Web Title: Sanjay Raut Warned Kirit Somaiya Allegations On Toilet Scam
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..