'त्या' एका वाक्याने घडले राईनपाडा हत्याकांड (व्हिडिओ)

बुधवार, 11 जुलै 2018

राईनपाडा (धुळे): बाजाराच्या पलिकडे छोटी मुलगी आहे ना ती माझ्या मुली सारखीच दिसते. त्या मुलीकडे बोट करून झालेला संवाद हा पाच निष्पाप जीवांच्या हत्येला कारणीभूत ठरला आहे, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर साक्री-धुळे एसटी प्रवासादरम्यान भेदरलेल्या अवस्थेत एकाने दिली.

राईनपाडा (धुळे): बाजाराच्या पलिकडे छोटी मुलगी आहे ना ती माझ्या मुली सारखीच दिसते. त्या मुलीकडे बोट करून झालेला संवाद हा पाच निष्पाप जीवांच्या हत्येला कारणीभूत ठरला आहे, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर साक्री-धुळे एसटी प्रवासादरम्यान भेदरलेल्या अवस्थेत एकाने दिली.

'राईनपाडा हत्याकांडानंतर भिक्षेकरी हे भेदरलेल्या अवस्थेत असून, अनेकांनी आपल्या गावाकडे परतीचा प्रवास सुरू केला आहे. आमचा धर्म म्हणून हे काम आम्ही करतो. परंतु, आमची पुढची पिढी तुम्हाला यामध्ये दिसणार नाही. आम्ही आमचे काम करत असतो पण समोरचा आमच्याकडे कोणत्या नजरेने पाहतो, हे सांगता येत नाही. माय-बाप अशी विनवणी करून भिक्षा मागतो कोणी देतो तर कोणी हाकलून देतो, आम्ही कोणाला काही बोलत नाही. पण, पाच जणांचा जीव गेल्याने मनात भिती बसली आहे,' असे शु्न्यात बघून तो सांगत राहतो.

राईनपाडा येथे 1 जुलै रोजी झालेल्या हत्याकांडामध्ये भारत शंकर भोसले (रा. खावे, मंगळवेढा), दादाराव शंकर भोसले (रा. खावे, मंगळवेढा), भारत शंकर मालवे (रा. खावे, मंगळवेढा), अगनू इंगोले (रा. मानेवाडी, मंगळवेढा) व राजू भोसले (रा. गोंदवून, कर्नाटक) यांना जीव गमवावा लागला. 1 जुलै रोजी राईनपाडा गावाचा बाजार होता. बाजार निमित्त नाथपंथीय डवरी समाजातील सात भिक्षेकरी गावात उतरले होते. त्यांच्या हातामध्ये पिशव्या होत्या. यामधील एकाने बाजूच्या मुलीच्या दिशेने बोट केले व ती मुलगी माझ्या ताईसारखी दिसते, असे म्हटले. या दृश्यानंतर ग्रामस्थांनी सात पैकी पाच जणांना पकडून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नेऊन अक्षरशः ठेचून मारले.

ग्रामपंचायतीमध्ये पाच जणांना ठेचून मारण्यापूर्वी परिसरामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये मुले चोरणारी टोळी फिरत असल्याची अफवा होती. शिवाय, परिसरातील एका कथित यू ट्यूब चॅनलने घटनेपूर्वी मुले पळवणाऱ्यांबद्दल वृत्त दिले होते. यामुळे ग्रामस्थांनी या भिक्षेकरांना मुले चोरणारी टोळी समजून अक्षरशः ठेचून काढले. मारहाण होत असताना ते हात जोडून आम्ही चांगली माणसे असल्याचे सांगत होते. परंतु, त्यांच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नव्हते. या मारहाणीमध्येच त्यांना जीव गमवावा लागला.

...तर जीव वाचले असते
दारूच्या नशेत असलेल्यांनी पाच जणांना पकडून मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी ते आपण भिक्षेकरी असल्याबरोबरच सर्व कागदपत्रे असल्याचे सांगत होते. परंतु, मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करण्यात दंग असलेले व मारहाण पाहणाऱयांनी त्यांची सुटका केली असती तर पाच जीव नक्कीच वाचले असते.

मृतदेहांनाही ठेचत राहिले...
ग्रामपंचायत कार्यालयात पाच जणांची क्रुर हत्या झाल्यानंतरही पाच मृतदेहांना ते ठेचत राहिले होते. यावरूनच दारूच्या नशेची छिंग व्हॉयरल झालेल्या व्हिडिओमधून दिसून येते.

संबंधित बातमीः

Web Title: santosh dhaybar visit rainpada dhule mass murder case and st bus