ब्रेकिंग! घरात जेवढ्या खोल्या अन्‌ शौचालये तेवढ्यांनाच होम क्‍वारंटाईन अन्‌ बाकिच्यांना... 

तात्या लांडगे
Wednesday, 15 July 2020

महापालिका आयुक्‍तांच्या आदेशानुसार... 

  • प्रतिकारक शक्‍ती खालावलेल्यांची तथा पूर्वी गंभीर आजार असलेल्यांची संस्थात्मक विलगीकरणात रवानगी 
  • श्‍वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे, झटके, बोलण्यास अडखळणे, अशक्‍तपणा, पायास मुंग्या येणाऱ्यांनी तत्काळ रुग्णालयात जावे 
  • चेहरा, ओठ व नखे निळसर पडल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांचा लगेच घ्यावा सल्ला 
  • कोविड-19 च्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तींची माहिती लपविल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दाखल होणार गुन्हा 
  • संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्‍तींची देखरेख करण्यासाठी स्वतंत्र निरीक्षक 

सोलापूर : रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तींना 17 दिवस होम क्‍वारंटाईन करण्यात येणार आहे. मात्र, शहरातील 159 झोपडपट्ट्या आणि 61 अघोषित झोपडपट्यातील व्यक्‍तींना संस्थात्मक विलगीकरणातच ठेवले जाणार आहे. दुसरीकडे एखाद्या घरात जेवढी स्वतंत्र शौचालये असतील, तेवढ्याच व्यक्‍तींना होम क्‍वारंटाईन केले जाणार असून उर्वरित व्यक्‍तींना विलगीकरण केंद्रात हलविले जाणार आहे. 

शहरातील कोरोनाच्या संसर्गाची साखळी खंडीत करण्याच्या हेतूने उद्यापासून (ता. 16) कडक लॉकडाउन केला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्‍तांनी ठोस निर्णय घेत आता होम क्‍वारंटाईनची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तीला 17 दिवस होम क्‍वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. परंतु, घरामध्ये स्वतंत्र खोल्या व शौचालयाची सोय नसल्यास तेवढ्या व्यक्‍तींना विलगीकरण सेंटरमध्ये पाठविले जाणार आहे. तर झोपडपट्ट्यांमधील रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तींची संस्थात्मक विलगीकरणात रवानगी केली जाईल, असेही आयुक्‍तांनी स्पष्ट केले. दरम्यान, रुग्णांच्या घरातील सर्व व्यक्‍ती, पीपीई किट न घालता रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्‍ती, एक मिटरपेक्षा कमी अंतरावरुन संपर्कात आलेल्या व्यक्‍ती, लक्षणे दिसण्यापूर्वी दोन दिवस अगोदर संपर्कात आलेल्या व्यक्‍ती हाय रिस्क गटात मोडतात. त्यांना क्‍वारंटाईन केले जाणार आहे. होम क्‍वारंटाईनमधील व्यक्‍तींनी घरातील कोणाच्याही संपर्कात येऊ नये, नेहमी सर्जिकल मास्कचा वापर करणे आवश्‍यक आहे, असेही महापालिका आयुक्‍तांनी म्हटले आहे. 

कोविड-19 च्या कंट्रोल रुमला साधा संपर्क 
कोरोनासंबंधी अडचणी व प्रश्‍न असल्यास तथा एखाद्या रुग्णाला त्रास होऊ लागल्यास संबंधितांनी महापालिकेच्या कोविड कंट्रोल रुमशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार 0217-2735293 हा क्रमांक महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे. तर रुग्णाला घेऊन जाण्यासाठी 108 या क्रमांकावर संपर्क करावा, असेही सांगण्यात आले आहे. 

महापालिका आयुक्‍तांच्या आदेशानुसार... 

  • प्रतिकारक शक्‍ती खालावलेल्यांची तथा पूर्वी गंभीर आजार असलेल्यांची संस्थात्मक विलगीकरणात रवानगी 
  • श्‍वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे, झटके, बोलण्यास अडखळणे, अशक्‍तपणा, पायास मुंग्या येणाऱ्यांनी तत्काळ रुग्णालयात जावे 
  • चेहरा, ओठ व नखे निळसर पडल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांचा लगेच घ्यावा सल्ला 
  • कोविड-19 च्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तींची माहिती लपविल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दाखल होणार गुन्हा 
  • संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्‍तींची देखरेख करण्यासाठी स्वतंत्र निरीक्षक 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saperate rooms and toilets for as Home quarantine person