अन्‌ बाळासाहेब देसाईंचे अश्रू तुकडोजी महाराजांच्या मृत्युपत्रावर पडले!

अरुण गुरव
Monday, 13 July 2020

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ बोटे महाराजांनी या शासकीय विश्रामगृहामध्ये गृहराज्यमंत्री श्री. देसाई यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेले 
ग्रंथ श्री. बोटे महाराजांनी श्री. देसाई यांना भेट देऊन त्यांचा सत्कार केला.

मोरगिरी (जि. सातारा) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मृत्युपत्राचे वाचन करताना लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे डोळे डबडबून आले. नकळत त्यांचे अश्रू त्या मृत्युपत्रावर पडले. ते मृत्युपत्र अजूनही आश्रमामध्ये जपून ठेवल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ बोटे महाराजांनी दिली. 

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे आपला वाशिम जिल्ह्याचा दौरा आटोपून अमरावतीमार्गे येत असताना मोझरी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये थांबले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ बोटे महाराजांनी या शासकीय विश्रामगृहामध्ये गृहराज्यमंत्री श्री. देसाई यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेले ग्रंथ श्री. बोटे महाराजांनी श्री. देसाई यांना भेट देऊन त्यांचा सत्कार केला. त्यावेळी श्री. बोटे महाराज हे तुकडोजी महाराज आणि बाळासाहेब देसाई यांच्या आठवणी सांगत होते.

तुकडोजी महाराज व बाळासाहेब देसाई यांचे गुरुशिष्याचे नाते होते. अत्यंत महत्त्वाच्या आणि दुर्लक्षित राहिलेल्या या नात्यातील धागा बाळासाहेब देसाई यांचे नातू गृहराज्यमंत्री श्री. देसाई व श्री. बोटे महाराज या दोन मान्यवरांच्या भेटीमुळे समोर आला. तुकडोजी महाराज आणि बाळासाहेब देसाई या गुरुशिष्याचे नाते इतके घट्ट होते की, महाराजांचे निधन 11 ऑक्‍टोबर 1968 रोजी झाले. तत्पूर्वी तुकडोजी महाराजांनी मृत्युपत्र तयार केले होते. त्या वेळी असा उल्लेख आढळून येतो की, स्वतः तुकडोजी महाराजांनी माझे मृत्युपत्र हे बाळासाहेब देसाई यांच्यासमोर आणि त्यांच्या हस्ते वाचन करावे, असे लिहिलेले होते.

तुकडोजी महाराजांचे मृत्युपत्र वाचन करताना बाळासाहेब देसाई यांचे डोळे अक्षरशः डबडबून आले होते आणि मृत्युपत्र वाचताना नकळत बाळासाहेब देसाई यांचे अश्रू त्या मृत्युपत्रावर पडले होते. ते मृत्युपत्र अजूनही आश्रमामध्ये जपून ठेवल्याचे श्री. बोटे महाराज यांनी आवर्जून सांगितले. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara And Balasaheb Desai's Tears Fell On Will Of Tukdoji Maharaj