esakal | रेठरा बासुमतीचा सुगंध अटकेपार
sakal

बोलून बातमी शोधा

karad

कृष्णाकाठचे रेठरे बुद्रुक जवळजवळ पाच दशकांपासून "रेठरा बासुमती' तांदळामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात ओळखले जात आहे. उत्तम दर्जा व सुवासिक तांदूळ उत्पादनासाठी उपयुक्त ठरत असल्याने "रेठरा बासुमती' तांदळाचा ब्रॅंडच तयार झाला आहे. 

रेठरा बासुमतीचा सुगंध अटकेपार

sakal_logo
By
अमाेल जाधव

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : काही गावं ऐतिहासिक स्थळे व वारसा त्याचबरोबर नावीन्यपूर्ण लौकिकामुळे ओळखली जातात. अशाच पद्धतीने कृष्णाकाठचे रेठरे बुद्रुक जवळजवळ पाच दशकांपासून "रेठरा बासुमती' तांदळामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात ओळखलं जात आहे. गावच्या शिवारातील मातीचा गुणधर्म हा उत्तम दर्जा व सुवासिक तांदूळ उत्पादनासाठी उपयुक्त ठरत असल्याने "रेठरा बासुमती' तांदळाचा ब्रॅंडच तयार झाला आहे. रेठऱ्यात पिकणाऱ्या या सुवासिक तांदळाची ख्याती आता देशाबाहेर पोचली आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्राची जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीकाठी रेठरे बुद्रुक वसले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर तत्कालीन नेत्यांनी सहकारी चळवळीचा पाया घातला. या पायातील येथील कृष्णा सहकारी साखर कारखाना हा एक दगड. माजी मंत्री (कै.) यशवंतराव मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली रेठऱ्याला कृष्णा सहकारी साखर कारखाना उभारला. या कारखान्याचा पहिला गळीत हंगाम 1961 मध्ये झाला. तेव्हापासून आजतागायत कृष्णा साखर कारखाना हा या भागातील शेतकऱ्यांच्या प्रगतीचा कणा बनला आहे. कारखान्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांचं तोंड गोड झालं आणि चार सुखाचे दिवसही दाखवले. यामुळेच या भागाला साखरपट्टा किंवा ऊसपट्टा असंही म्हंटले जाते. याच साखरपट्ट्यातील रेठऱ्यात ऊस सोडून बासुमती भात पीक लावण्याचा प्रयोग केला गेला आणि तो यशस्वीदेखील झाला. या गावाला तीन बाजूंनी कृष्णा नदीने वेढले आहे. त्यामुळे पाण्याची जराही कमतरता नाही. जवळपास तीन हजार एकर काळी सुपीक जमीन गावात नगदी पिकायोग्य आहे. गावातच कारखाना असल्यामुळे पूर्वी रेठऱ्यात प्रत्येक शेतकरी ऊस लागवड करायचा. बागायती शेतीत रिस्क कमी व परतावा मिळण्याची जास्त शक्‍यता असल्यामुळे उसाकडेच अनेकांचा भर असायचा. गावच्या शिवारात स्वातंत्र्यपूर्व काळात काही देशी वाणाचे भात पीक घेतले जाई. कृष्णा कारखाना उभा राहिल्यापासून नजर जाईल तिथे ऊस पीक दिसू लागले. 

साधारण सत्तरच्या दशकात येथील कृषिमहर्षी (कै.) आबासाहेब मोहिते यांनी हिमाचल प्रदेशमधील नैनिताल येथून बासुमती तांदळाचे 370 वाणाचे बियाणे आणून शेतात घेतले. त्यानंतर बासुमती तांदूळ रेठऱ्याच्या मातीत रुजला. या पिकाच्या सुवासाने परिसर बहरून गेला आणि बासुमती तांदळाचे पीक पाहण्यास आसपासचे शेतकरी येऊ लागले. आबासाहेबांचा प्रयोग यशस्वी ठरला. पुढच्याच वर्षापासून अनेक शेतकऱ्यांनी हे पीक घेण्यास सुरवात केली. 

हळूहळू गावात बासुमती भात पिकू लागले. आसपासच्या गावातही या वाणाची बिजे पसरली. काही काळानंतर वडगाव मावळ येथील कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रातून इंद्रायणी तांदळाचे काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी बियाणे आणले. बासुमतीपेक्षा जास्त उत्पन्न निघत असल्यामुळे या तांदळालादेखील प्रचंड मागणी होऊ लागली. 

आजमितीला दर्जेदार व सुवासिक रेठरा बासुमती व इंद्रायणी तांदूळ येथील शिवारात मातीतील विशिष्ट गुणधर्म व गावास तिन्ही बाजूने वाहणाऱ्या नदीतील पाण्याच्या आद्रतेमुळे पिकतो. खरं तर तांदूळ हे समुद्रकिनारपट्टीच्या भागातील पीक मानले जाते. महाराष्ट्रात कोकणात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. शास्त्रज्ञांच्या मते रेठऱ्याच्या तिन्ही बाजूंनी वाहणाऱ्या कृष्णा नदीतील पाण्यातील बाष्पीभवनामुळे तांदूळ पिकासाठी लागणारी उपयुक्त आर्द्रता शिवारात सर्वत्र निर्माण होते. त्याचा फायदा तांदळाच्या चवीला व सुवासिकपणाला होतो. रेठरे गावात प्रवेश केला की, घराघरांतून हा तांदळाचा खास वास नक्की अनुभवता येतो. 

सातारा, सांगली, कोल्हापूरच नाही तर पुणे-मुंबईलादेखील दुकानाबाहेर रेठरा तांदूळ मिळेल, अशी जाहिरात दिसते. रेठरेमधील तांदळाच्या यशामुळे कऱ्हाड तालुक्‍यात अनेक गावांत इंद्रायणी तांदळाचे उत्पादन घेतले जाते. इथला तांदूळ फक्त महाराष्ट्रातच नाही, तर अटकेपार दुबईपर्यंत जाऊन पोचला आहे. 

संपादन ः संजय साळुंखे

दुप्पट शेती उत्पादनासाठी शासनाचे पाऊल, 407 शेतकरी गटांना साडेसोळा कोटी अनुदान