छत्रपतींच्या वारसदारांचा अपमान कदापि सहन करणार नाही : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

बाळकृष्ण मधाळे
Thursday, 8 October 2020

छत्रपतींच्या वंशजांवर अशा प्रकारे टीका करणं निश्चितपणे गैर आहे, चुकीचं आहे. आम्ही सातारकर म्हणून आणि छत्रपतींना मानणारे छत्रतींचे मावळे म्हणून छत्रपतींच्या वारसदारांवर अशाप्रकारे केलेली टीका कदापि सहन करणार नाही, खपवून घेणार नाही. आंबेडकरांनी, आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका त्यांनी मांडावी आणि मराठा समाज आपली आरक्षणासंदर्भात भूमिका ठामपणे मांडत असून शासनाकडे त्याचा पाठपुरावा करतो आहे, असा सल्लाही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी आंबेडकरांना दिला.

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज आणि आमच्या सर्वांचे आदर्श खासदार उदनराजे भोसले यांच्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी केलेली टीका निंदणीय असून त्याची जेवढी निंदा करावी तेवढी कमीच आहे. शेवटी छत्रपती घराण्याला, छत्रपतींच्या गादीला संपूर्ण महाराष्ट्रातील जनता वंदन करते, हे प्रकाश आंबेडकरांनी आधी समजून घ्यावं. दोन्हीही छत्रपतींनी आरक्षणासंदर्भात सातारची गादी आणि कोल्हापूरच्या गादीच्या प्रतिनिधींनी त्यांची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे, त्यामुळे आंबेडकरांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावं, अशा शब्दात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.   

गृहराज्यमंत्री देसाई पुढे म्हणाले, छत्रपतींच्या वंशजांवर अशा प्रकारे टीका करणं निश्चितपणे गैर आहे, चुकीचं आहे. आम्ही सातारकर म्हणून आणि छत्रपतींना मानणारे छत्रतींचे मावळे म्हणून छत्रपतींच्या वारसदारांवर अशाप्रकारे केलेली टीका कदापि सहन करणार नाही, खपवून घेणार नाही. आंबेडकरांनी, आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका त्यांनी मांडावी आणि मराठा समाज आपली आरक्षणासंदर्भात भूमिका ठामपणे मांडत असून शासनाकडे त्याचा पाठपुरावा करतो आहे, असा सल्लाही त्यांनी आंबेडकरांना दिला. मराठा समाजातल्या एकूण सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्याला दोन्ही राजेंनी आपली भूमिका स्पष्ट करुन जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, असे असताना प्रकाश आंबेडकरांनी अशा प्रकारे टीका करणे योग्य नाही. 

सातारा आणि काेल्हापूर या दाेन्ही राजघराण्यांना मानणारे देखील आंबेडकर यांच्या वक्तव्याबाबत नाराज झाले आहेत

मला माहित नाही आंबेडकरांनी असे का विधान केलं असावं, पण हे वक्तव्य निश्चितपणे निंदणीय आहे. सातारच्या गादीचा अशाप्रकारचा केलेला अवमान आम्ही कधीही सहन करणार नाही. आपल्याला आठवत असेल,  मी २०१४ ते १९ रोजी आमदार असताना एका चुकीच्या गुन्ह्यामध्ये उदयनराजेंवर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी विधानसभेच कामकाज तेव्हा मी बंद पडलं होतं. छत्रपतींच्या वारसावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल होणं चुकीचं आहे, असे सांगत त्यांनी छत्रपतींच्या वारसावर असलेले प्रेम निदर्शनास आणून दिले. सातारा जिल्ह्यातीलच नव्हे, महाराष्ट्रातील जनता, छत्रपती घराण्याचे प्रेमी, जे छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात आणि त्यांच्या वारसांना आदर्श मानतात, त्यांच्यावरती केलेली अशी टीका आम्ही कदापि सहन करणार नाही, अशा तीव्र शब्दात गृहराज्यमंत्री देसाईंनी प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Prakash Ambedkar Statement Condemn Home Minister Shambhuraj Desai