पावसासाठी यंदा पाथरपुंज "नंबर वन'

patan
patan

कोयनानगर (जि. सातारा) ः कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद यापूर्वीपासून होत होती. मात्र, यंदा वारणावती वसंत सागर जलाशयलाच्या क्षेत्रात असलेल्या पाथरपुंजमध्ये (ता. पाटण) सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पाथरपुंजला ता. 29 ऑगस्टपर्यंत पाच हजार 698 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा, महाबळेश्‍वर व वलवण या चारही अतिपावसाच्या ठिकाणांना मागे टाकून पाथरपुंजने पहिला क्रमांक पटकावला आहे. पाथरपुंजला पडणारा पाऊस सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांसाठी वरदान ठरत आहे. 

गतवर्षीपासून राज्यात रेकॉर्डब्रेक पाऊस पडत आहे. जिल्ह्यात चार ठिकाणी पर्जन्यमाया होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात प्रामुख्याने कोयना पाणलोट क्षेत्रातील नवजा, वलवण, महाबळेश्वर या ठिकाणांचा समावेश होत असला तरी या ठिकाणांबरोबर देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणाऱ्या चेरापुंजीला मागे टाकणारे म्हणून उदयास आलेले व दुर्लक्षित असलेले ठिकाण म्हणजे पाथरपुंज. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात नेहमीच मुसळधार पाऊस पडतो. मुसळधार पावसाचे माहेरघर ठरविण्यासाठी पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा, महाबळेश्वर या ठिकाणी नेहमीच स्पर्धा चालू असते. त्यातील कोयना व महाबळेश्वर या ठिकाणांना मागे टाकत वलवण या पाणलोट क्षेत्राने मुसंडी मारली आहे. वलवण व नवजा या पाणलोट क्षेत्रात सध्या स्पर्धा सुरू आहे. कोयना पाणलोट क्षेत्रातील वलवणमध्ये एक जून ते 29 ऑगस्टपर्यंत पाच हजार 104 मिलिमीटर, नवजात चार हजार 612, तर महाबळेश्वरमध्ये चार हजार 435 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

कोयना विभागाच्या दक्षिण टोकावर चांदोली अभयारण्यात येणारे हे गाव आहे. पाटण तालुक्‍यात हे गाव येत असले तरी सातारा, सांगली, रत्नागिरी या तीन जिल्ह्यांच्या सीमारेषेवर ते वसले आहे. या गावांतील घरे तिन्ही जिल्ह्यांत विभागली आहेत. कोयनेच्या दक्षिण टोकावर हे गाव वसले असले तरी या ठिकाणी उच्चांकी पडणाऱ्या पावसाचे पाणी वसंतसागर धरणात जात असल्याने हे धरण ओव्हरफ्लो होते. 


वारणा खोऱ्यातील निवळी, धनगरवाडा व पाथरपुंज ही तीन रेनगेज स्टेशन येतात. त्यातील निवळी व पाथरपुंज या ठिकाणी पडणारा पाऊस अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे वसंतसागर धरण पूर्णक्षमतेने भरते. 

- मिलिंद किटवाटकर, सहायक कार्यकारी अभियंता, चांदोली धरण व्यवस्थापन 

संपादन ः संजय साळुंखे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com