लढवय्या चिरतरुण

सत्यजित तांबे
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

पक्षातील महत्त्वाचे सहकारी ऐनवेळी सोडून गेले, त्यातच राज्य सहकारी बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने नोटीस पाठविल्यानंतर ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला’, अशी चर्चा सुरू असताना ८० वर्षांचे चिरतरुण नेते शरद पवार प्रचाराच्या आखाड्यात उतरले.

पक्षातील महत्त्वाचे सहकारी ऐनवेळी सोडून गेले, त्यातच राज्य सहकारी बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने नोटीस पाठविल्यानंतर ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला’, अशी चर्चा सुरू असताना ८० वर्षांचे चिरतरुण नेते शरद पवार प्रचाराच्या आखाड्यात उतरले. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे त्यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. शेतकरी आत्महत्यांसह बेरोजगारी आणि मंदीचा बसलेला फटका आदी मुद्द्यांवरून सडेतोड सवाल करत सत्ताधाऱ्यांना ‘बॅकफूट’वर ढकलण्यात त्यांनी यश मिळविले. पवार यांनी ज्या पद्धतीने आघाडीचे नेतृत्व करून एकापाठोपाठ एक सभा घेतल्या, त्यामुळे प्रस्थापितांविरुद्ध लाट तयार झाली असे म्हटले तर वावगे ठरू नये.

याआधीही १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर अनेक आरोप केले. त्यातून भाजप- शिवसेना युतीने १९९५ मध्ये सत्ता तर मिळवली, पण युतीच्या नेत्यांना पवार यांच्यावरील एकही आरोप सिद्ध करता आला नाही. १९९५पासूनच्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेना- भाजपच्या नेत्यांनी पवार यांनाच लक्ष्य केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने पुन्हा हाच फंडा वापरण्याचा प्रयत्न केला, पण पवार यांनी मुत्सद्दीपणाने भाजपचे सर्व मनसुबे उधळून लावले.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवार यांना ‘ईडी’ची नोटीस पाठविली म्हणजे निवडणुकीची अर्धी लढाई आपण जिंकली, अशा थाटात भाजपचे नेते वावरत होते. पण या प्रकरणी बचावात्मक भूमिका न घेता स्वतःहून चौकशीसाठी ‘ईडी’च्या कार्यालयात जाण्याचा निर्णय पवार यांनी घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस, युवक काँग्रेस आणि सर्वच विरोधी पक्षांनी पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. अखेर पवार यांनी चौकशीसाठी ‘ईडी’च्या कार्यालयात तूर्त येण्याची गरज नाही, असा पोलिस आयुक्तांमार्फत निरोप देऊन सपशेल माघार घेण्याची नामुष्की सरकारवर आली. या सर्व प्रकरणात ‘ईडी’च्या आडून टाकलेला डाव भाजपवरच उलटला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचारसभांची माळ लावून पहिल्या टप्प्यात प्रचारात आघाडी घेतली. राजकीय वर्तुळातही ही निवडणूक एकतर्फी होते की काय, अशी चर्चा रंगली. नेमक्‍या याचवेळी पवार प्रचाराच्या आखाड्यात उतरले. ‘घटनेतील ३७०वे कलम रद्द केले हे चांगलेच झाले, पण गेल्या पाच वर्षांत किती लोकांना नोकऱ्या दिल्या, भाजपच्या राजवटीत किती नवे उद्योग सुरू झाले आणि त्यातून किती रोजगार निर्माण झाला? वाहन उद्योगातील किती कामगारांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या,’ असे प्रश्‍न विचारून पवार यांनी भाजपला कोंडीत पकडणे सुरू कले. पवार यांनी विचारलेल्या एकाही प्रश्‍नाचे उत्तर भाजपला देता आले नाही. चांदा ते बांद्यापर्यंत साठपेक्षा जास्त प्रचारसभा घेऊन पवार यांनी भाजपची पोलखोलच केली.

एकीकडे मोदींपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी पवार यांनाच प्रचारात लक्ष्य केले आणि पवार यांनीही थेट मुख्यमंत्र्यांवर प्रहार करून संपूर्ण निवडणूक आपल्याभोवती कशी केंद्रित राहील, असा मुत्सद्दीपणा दाखविला. त्यांच्या सभांना मिळालेला अफाट प्रतिसाद हे महाराष्ट्रातील वारे फिरल्याची जणू साक्षच देत होते. सातारा येथे भर पावसात त्यांनी जी सभा घेतली आणि त्या सभेला अंगावर पाऊस झेलत लाखो लोक उपस्थित होते, ही घटना पवार यांची लोकप्रियता आणि त्यांचा करिष्मा कायम आहे, याची प्रचिती देणारी होती. या निवडणुकीत पवार यांनी  एकहाती प्रचार केला, विरोधकांचे आरोप झेलण्याचा धीरोदात्तपणा दाखविला आणि निवडणुकीत जय मिळो अथवा पराभव, पण मैदानात शेवटपर्यंत राहून किल्ला लढविण्याचे धाडस दाखविले. या सर्व बाबी निश्‍चितपणे नेतृत्व करू इच्छिणाऱ्या भावी नेत्यांसाठी एकप्रकारे मापदंडच ठरणार आहेत, यात शंका नाही.

सत्यजित तांबे (अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satyajeet tambe article sharad pawar