
Satyajeet Tambe : निवडून आणण्यासाठी भाजपने तांबेंना 'अशी' केली मदत; स्वतः सत्यजीत यांनी दिली माहिती
नाशिकः नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले सत्यजीत तांबे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी निवडणुकीदरम्यान भाजपने मदत केल्याचं सांगितलं.
सत्यजीत तांबे म्हणाले की, मी सुरुवातीपासून पक्षाकडे पद किंवा काहीतरी जबाबदारी मागितली. मात्र मला पक्षाचे प्रभारी एच.के. पाटील यांनी सांगितलं की तुम्ही वडिलांच्या जागी प्रयत्न करा. त्यानंतर कार्यकर्त्यांचा रेटा पाहून वडिलांनीच माघार घ्यायचं ठरवलं.
मी पदवीधर मतदारसंघातून अर्ज सादर भरण्याचा निर्णय घेतला. मात्र काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाकडून दोन एबी फॉर्म चुकीचे पाठविण्यात आल्याचा गौप्यस्फोट सत्यजीत तांबे यांनी केला. तांबे यांनी यावेळी पक्षावर आरोप केले आहेत.
भाजपने केलेल्या मदतीबद्दल बोलतांना ते म्हणाले की, मी भाजपचे आभार मानतो, कारण त्यांनी न मागता मला एक प्रकारे पाठिंबा दिला. भाजपचे लोक बूथवर बसून माझं काम करत होते. भाजप नेतृत्वाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यासंदर्भात विधान केल्याने फरक पडला. यासह काँग्रेस आणि शिवसेनेच्या लोकांनी मदत केल्याचं तांबेंनी स्पष्ट केलं.
मी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते आणि अपक्ष म्हणूनच भविष्यात काम करणार आहे, असं सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केलं आहे.