Shivrajyabhishek 2023 : स्वराज्यनिर्मितीच्या आऊसाहेबांच्या व्रताचे उद्यापन म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा !

कालगणना हा इतिहास आणि वर्तमानाला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे या कालगणनेचे चार प्रमुख टप्पे सांगता येतात.
chhatrapati shivaji maharaj and jijabai
chhatrapati shivaji maharaj and jijabaisakal

- सायली गोडबोले- जोशी

कालगणना हा इतिहास आणि वर्तमानाला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे या कालगणनेचे चार प्रमुख टप्पे सांगता येतात. युद्धिष्ठिर युगाब्द, त्यानंतर विक्रम संवत्सर, तदपश्चात शालिवाहन शके आणि मग ‘श्रीराज्याभिषेक शक’! हिंदवी स्वराज्यसंस्थापक, क्षत्रियकुलवतंस, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज, सकळगुणमंडित, सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व आणि चरित्र व चारित्र्याचा जिवंत आविष्कार म्हणजे छत्रपती शिवराय!

मध्ययुगाच्या कालखंडात राजेशाही पद्धतीतही लोकशाहीची परंपरा निर्माण करणारे युगप्रवर्तक राजे म्हणजे शिवराय! वतन पद्धती बंद करून वेतन पद्धती सुरू करून सारी रयत एकाच न्यायाच्या पारड्यात तोलणारे आदर्श व्यवस्थापक म्हणजे शिवराय! शत्रूला आपल्या भूमीतून परास्त करून पाठवतानाही त्याच्या लेकीबाळींची घेतलेली काळजी महाराजांच्या आदर्श नैतिक मूल्यांची साक्ष देते. जिंकलेल्या मुलुखाचा कारभार स्वराज्याच्या शिस्तीने वसवताना प्रसंगी मातेचे कोमल ह्रदय धारण करणारे शिवराय, स्वराज्यद्रोह्याला शिक्षा करताना, स्वराज्यात स्त्रीचा सन्मान जपण्यासाठी पाटील, देशमुखांचाही चौरंग करणारे शिवराय म्हणजे साक्षात महाकालच!

गुणांची खाण

निःस्पृह, स्वार्थाचा लवलेशही नसलेले, अखंड कार्यमग्न असलेले, ध्येयपूर्तीपर्यंत संकल्पापासून न ढळणारे, धर्माच्या मार्गाने चालणारे, नैतिकतेचे भान राखणारे, आदर्श आचारविचारांचा पाया घालणारा, भक्तिरसात रंगलेले, राष्ट्राभिमानी, न्यायप्रिय, मातृभक्त, धर्मरक्षक, आदर्श व्यवस्थापक म्हणजे छत्रपती शिवराय! रणांगणावर तलवार गाजवणारा अमोघ पराक्रमी राजा, निम्मे युद्ध तर अचूक नियोजन आणि डावपेचांनी जिंकणारा बुद्धिमतांवरिष्ठं असलेला राजा.

तोरण्यावरील गुप्तधन असो वा दोन वेळा केलेली सुरत लूट असो, कोठेही भ्रष्टाचार झाला नाही, हे श्रेय जितकं शिवरायांच्या विश्वासू स्वार शिपायांचं तितकंच गुणग्राहक आणि माणसं जोडण्यात निष्णात असलेल्या शिवरायाचंच! या साऱ्या धनापैकी काही धन आपण खासगीत भरती करावे हा विचारही कोणाच्या मनात आला नाही कारण स्वत: राजाच स्वराज्यसंस्कार प्राणमोलाने जपत होता. सापडलेल्या धनाचे काय केले तर गडकोट बांधले, अश्वदळ सुसज्ज केले, शस्त्रे घडवून घेतली, तोफगोळा तयार केला.... आजच्या समाजाने घ्यावा तो हा शिवविचारांचा आदर्श!

परंपरेची कास धरतानाच, भविष्याचा वेध घेणारा हा युगद्रष्टा राजा! ज्या काळात समुद्रप्रवास निषिद्ध मानला जाई त्याकाळात भविष्यात सागरी मार्गे येणारी संकटे ओळखून त्यांना समुद्रातच अडवायला उभारलेले सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग सारखे किल्ले असोत किंवा नव्या प्रकारच्या तलवारी, भाले घडविण्याचे कसब असो, किंवा हिंदुस्थानात रचलेला नौदलाचा पाया असो त्यांच्या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि पुरोगामी विचारांची ओळख पटवतात.

मातृभाषेचा कमालीचा अभिमान बाळगणारे शिवराय मराठीतच राज्यकारभार चालावा यासाठी रघुनाथ पंडितांकडून ‘राज्यव्यवहारकोश’ लिहून घेतात. नर्तकी मता बेगम असो वा शाहीर अज्ञानदास अशा कलाकारांचा यथोचित सन्मानही करतात. साक्षात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनीच आपल्या पित्याचा उल्लेख ‘म्लेंच्छक्षयदीक्षित’ असा केला आहे.

‘रायरेश्वराला’ साक्ष ठेवून घेतलेली स्वराज्याची शपथ ते ‘हे राज्य तो श्रीजगदिश्वराचे’ असं म्हणणारे शिवराय अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करतात, परधर्मात गेलेल्यांना पुन: हिंदू धर्मात घेऊन ‘हिंदूपदपातशहा’ हे आपले बिरुद जणू सार्थच करतात. स्वाभिमान, शौर्य, धैर्य या गुणांबरोबरच संयम हा सर्वांत मोठा गुण त्यांच्याकडे होता.

याच संयमाच्या, कुशल नेतृत्वाच्या, अचूक नियोजनाच्या आणि गनिमी काव्याच्या जोरावरच त्यांनी कोणाचा कोथळा काढला, तर कोणाची बोटे छाटली, कोणाच्या वेढ्यातून सुखरूप निसटले तर कोणाला चारी मुंड्या चीत केले. या साऱ्या कृतींमागची प्रेरणा होती, स्वराज्याची आस अन् हा स्वराज्यप्रेमाचा पान्हा त्यांना पाजला तो त्यांच्या मातु:श्री जिजाबाई आऊसाहेबांनी!

मातृहृदय मर्म : शिवबाराजे

आईच्या गर्भात असतानाच स्वराज्याचा ध्यासच त्यांनी घेतला आणि आईच्याच कृपाछत्राखाली शिवबा ते छत्रपती शिवराय हा प्रवास पूर्ण केला. विचित्र राजकीय पेचांमुळे थोरले बंधू संभाजीराजे व पिता शहाजीराजे यांचा सहवास त्यांना लाभला नाही, परंतु त्यांच्या सर्वच सुखदुःखांच्या व संकटांच्या काळात जिजाऊसाहेब कायमच त्यांच्या पाठीशी होत्या. आऊसाहेबांच्या कृतिशील मातृत्वामुळेच प्राणावर बेतलेल्या संकटांतूनही महाराजांची सुखरूप सुटका झाली.

स्वराज्य निर्मिती हे जणू आऊसाहेबांनी अंगीकारलेले जीवनव्रतच होते. त्याच व्रताचे उद्यापन करण्यासाठी त्या सतीचे घेतलेले वाण ठेवून देऊन शहाजी महाराजांच्या मृत्युपश्चातही त्या मागे राहिल्या. हे उद्यापन म्हणजेच ‘शिवराज्याभिषेक’!

मराठी अस्मिता आणि स्वाभिमान चिरकाल टिकावा आणि हिंदवी स्वराज्याचे सार्वभौमत्व संपूर्ण विश्वात सिद्ध व्हावे या हेतूने आऊसाहेबांनी शिवबांना राज्याभिषेक करवून घेण्याचे सुचविले नव्हे तर तशी गळच घातली. मातृआज्ञा प्रमाण मानणाऱ्या शिवरायांनीही आऊसाहेबांचा मानस लक्षात घेऊन त्यास मान्यता दिली, आणि श्रीनृप शालिवाहन शके, १५९६, आनंदनाम संवत्सरे, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला म्हणजेच तारीख ६ जून १६७४ रोजी झाला सोहळा - शिवराज्याभिषेक!

स्वराज्ययज्ञाची पूर्णाहुती

महाराष्ट्राच्या भूगोलाला इतिहास मिळवून देणारा क्षण म्हणजे, शिवराज्याभिषेक! शिवरायांपूर्वी जवळपास ३५० वर्षे या भूमीत कोणीही अभिषिक्त ‘हिंदूपदपातशहा’ नव्हता. गागाभट्टांनी याच कारणास्तव ‘राज्याभिषेकप्रयोग’ हा ग्रंथ सिद्ध केला, अन् सुरू झाली तयारी राज्याभिषेकाची! राज्याभिषेकाच्या निमित्ताने ऐंद्रियशांती, रूद्र, नवचंडी होम, गृहशांती, तुलादान अशा अनेकविध विधींबरोबरच दोन आगळेवेगळे सोहळे किल्ले रायगडावर साजरे झाले.

३२ मण सोन्याच्या सिंहासनावर शिवराय विराजमान झाले अन् चहुदिशांनी एकमुखाने जयनाद उमटला, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’! १६४५ पर्यंत ‘बंडखोर शिवाजी’ असा आपल्या पत्रांमध्ये उल्लेख करणारे सिद्दी, फिरंगी, पोर्तुगीज, डच वकील आपापल्या टोप्या झुकवून छत्रपती शिवरायांना मानवंदना देते झाले. अतुल्य, अत्युच्च, अपूर्व त्याखेरीज त्या सोहळ्याचे वर्णन करायला शब्द अपुरे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com