

सोलापूर : जिल्ह्यातील एक हजार गावांपैकी ३०९ गावांमध्ये ‘जलजीवन’ची कामे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत तब्बल २८६ कोटींचा खर्च या योजनेवर झाला आहे, तरीदेखील यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टॅंकरवर सुमारे १७ कोटींचा खर्च करावा लागेल, असा आराखडा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे.
सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सोलापूर जिल्हा टॅंकरमुक्त करण्यासाठी मोठे योगदान दिले होते. पण, त्यानंतर काही वर्षांतच जिल्ह्यात पुन्हा पाणीपुरवठ्यासाठी टॅंकर सुरू झाले आणि मागच्या वर्षीच्या दुष्काळातही अनेक गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. प्रत्येक घरांना स्वच्छ पाण्याचे नळ कनेक्शन मिळावे, नियमित पाणी गावागावातील प्रत्येक कुटुंबाला मिळावे या हेतूने केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मदतीने जलजीवन मिशन हाती घेतले. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातही कामे झाली, पण सध्या निधीअभावी कामे थांबली आहेत.
यंदाच्या उन्हाळ्यात सुमारे २०० गावे-वाड्यावस्त्यांना टॅंकरने पाणी पुरवावे लागेल, अशी स्थिती असल्याचेही टंचाई आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. ऑक्टोबर २०२४ ते जून २०२५ या काळातील सोलापूर जिल्ह्याचा टंचाई आराखडा २२ कोटी पाच लाख ७१ हजार रुपयांचा असून त्यात केवळ टॅंकरवरील अंदाजित खर्च साडेसोळा कोटींचा आहे.
तालुकानिहाय असे लागतील टॅंकर
तालुका टॅंकर
माळशिरस ९१
मंगळवेढा ७५
द.सोलापूर ६४
सांगोला ५७
अक्कलकोट ५५
करमाळा २८
माढा १९
पंढरपूर १८
बार्शी ०९
मोहोळ ०८
एकूण ४३३
सोलापूर शहरात महापालिकेचे ४० टॅंकर सुरु
औज बंधाऱ्यात सध्या १५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असून उजनीतून भीमा नदीद्वारे सोडलेले पाणी २४ फेब्रुवारीपर्यंत औजमध्ये पोचणार आहे. ते पाणी पुढील ५० दिवस पुरणार आहे. तरीपण, सध्या सोलापूर महापालिका हद्दीतील प्रभाग क्र. दोन, तीन, चार व पाचमध्ये महापालिकेच्या टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व पाणीपुरवठा विभागाचे अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली. उन्हाळ्यातही ते टॅंकर सुरू राहतील, पण त्यावेळी टॅंकरच्या खेपा वाढतील. हिप्परगा रोड, विडी घरकूल, निलम नगर, विमानतळ व सोरेगाव परिसर अशा नगरांमध्ये पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना खासगीऐवजी महापालिकेने स्वत:च्या टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरु ठेवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.