ऑनलाइन शिक्षणासाठी राज्यातील शाळांना आता गूगल क्‍लासरुम 

संतोष सिरसट 
Sunday, 12 July 2020

डेटा राहणार शिक्षण विभागाकडे 
गूगल क्‍लासरुम हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देणार आहे. मात्र, विद्यार्थी व शिक्षकांचा सगळा डाटा शिक्षण विभागाकडे राहणार आहे. 
दिनकर पाटील, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. 

सोलापूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर ऑनलाइन शिक्षण देण्यावर भर सुरु आहे. विद्यार्थी व शिक्षकांमध्ये योग्य समन्वय साधला जावा. शिक्षकाने केलेले अध्यापन विद्यार्थ्यास समजावे यासाठी राज्यातील शाळांमध्ये गुगल क्‍लासरुम सुरु केले जाणार आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेले प्रशिक्षण पहिल्या टप्यात सरकारी शाळांमधील 40 हजार शिक्षकांना दिले जाणार आहे. 

ऑनलाइन शिक्षणाची ही नवी संकल्पना शिक्षण विभागाने सुरु केली आहे. पहिल्या टप्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांनी नावनोंदणी करणे आवश्‍यक आहे. नाव नोंदणीसाठी उद्या (सोमवारी) रात्री 11 वाजून 55 मिनिटांपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या काळात तंत्रस्नेही, आवड असलेल्या, स्वतःकडे संगणक असलेल्या, लॅपटॉप असलेल्या दोन ऍन्ड्रॉईड मोबाईल असलेल्या सरकारी शाळेतील शिक्षकांनी हिीीं://सेसश्रश.रववळपसवळाशपीळेपी.ळप/कोश.रिरु या लिंकवर जाऊन नावनोंदणी करायची आहे. पहिल्या टप्यात 40 हजार शिक्षकांना प्रशिक्षण दिल्यानंतर पुन्हा तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. 

तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थी व शिक्षक यांना प्रत्यक्ष संवाद साधता यावा, शिक्षकांना विद्यार्थ्यास विविध संदर्भ साहित्य अभ्यासास देता यावे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करता यावे, विद्यार्थ्याला शिक्षकांच्या अध्यापनाचा, गृहपाठाचा, सूचनांचा त्याच्या सोईच्यावेळी पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद याच्यातर्फे राज्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्यासाठी गूगल क्‍लासरुम ही सुविधा मोफत स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यास, शिक्षकास शाळेसाठी आयडी तयार करुन देण्यात येणार आहे. या आयडीच्या सहायाने शिक्षक एकावेळी 250 विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन तासिका घेऊ शकणार आहे. या तासिका रेकॉर्ड करुन कधीही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी हे सोईचे होणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools in the state now have Google classrooms for online learning