मोठी बातमी! जुलैमध्ये सुरु होणार नाहीत शाळा; संसर्ग कमी होईपर्यंत शाळांना राहणार टाळे 

तात्या लांडगे
Monday, 29 June 2020

त्याच महिन्यात अथवा त्यादिवशीच वर्ग सुरु करा, असे म्हटलेले नाही
जुलैमध्ये नववी, दहावी व बारावीचे वर्ग, ऑगस्टमध्ये सहावी ते आठवीचे तर सप्टेंबरमध्ये पहिली ते पाचवीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने परिपत्रक काढले. मात्र, त्याच महिन्यात अथवा त्यादिवशीच वर्ग सुरु करावेत, असे कुठेही म्हटलेले नाही. संबंधित जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग व प्रतिबंधित क्षेत्राची परिस्थिती पाहून शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यायचा आहे. 
- दिनकर पाटील, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालय, पुणे 

सोलापूर : राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शाळा सुरु करण्याचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर पडला आहे. शिक्षण विभागानेही अंग काढून घेत शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला आहे. त्यामुळे पावसाळा संपल्याशिवाय शाळा सुरु करणार नाही, अशी भूमिका मुख्याध्यापकांनी घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर शिक्षकांनी आता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपुरताच अभ्यासक्रम शिकविण्यावर भर दिला आहे. तर जुलैपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचे नियोजन लांबणीवर पडले आहे. 

लॉकडाउनच्या निर्णयाच्या धर्तीवर शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय राज्यस्तरावर व्हावा, अशी अपेक्षा मुख्याध्यापकांसह संस्था चालकांनी व्यक्‍त केली आहे. मात्र, शालेय शिक्षण विभागाने अंग काढून घेत, शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून राज्य सरकारच्या स्पष्ट निर्देशाशिवाय शाळा सुरु केल्या जाणार नाहीत, अशीही भूमिका काहींनी घेतली आहे. शाळा सुरु केल्यानंतर अनावधनाने एखादा विद्यार्थी या विषाणूचा बळी ठरल्यास, त्यासाठी आपल्याला जबाबदार धरले जाईल, अशी भिती मुख्याध्यापकांना वाटू लागली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे कमी झाल्याशिवाय शाळा सुरु न करण्यावर मुख्याध्यापक ठाम असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे संसर्ग वाढत असल्याने कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍तींची विलगीकरण कक्षात संख्या वाढू लागली आहे. संसर्ग रोखण्यासाठी रुग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक विलगीकरण कक्षात ठेवण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे आणखी काही शाळा, महाविद्यालयांच्या इमारती विलगीकरण कक्षासाठी घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे शाळा सुरु करण्याचा मुहूर्त लांबणीवर पडल्याचे स्पष्ट होत आहे. 

त्याच महिन्यात अथवा त्यादिवशीच वर्ग सुरु करा, असे म्हटलेले नाही
जुलैमध्ये नववी, दहावी व बारावीचे वर्ग, ऑगस्टमध्ये सहावी ते आठवीचे तर सप्टेंबरमध्ये पहिली ते पाचवीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने परिपत्रक काढले. मात्र, त्याच महिन्यात अथवा त्यादिवशीच वर्ग सुरु करावेत, असे कुठेही म्हटलेले नाही. संबंधित जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग व प्रतिबंधित क्षेत्राची परिस्थिती पाहून शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यायचा आहे. 
- दिनकर पाटील, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालय, पुणे 

राज्यातील एकही शाळा सुरु नाही 
दरवर्षी 15 जूनपासून राज्यातील शाळा सुरु होतात. तर कोरोनाच्या वैश्‍विक संकटामुळे यंदा जुलैपासून टप्प्याटप्याने शाळा सुरु करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले होते. मात्र, मागील काही दिवसांत राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सोशल डिस्टन्स ठेवून मोकळ्या मैदानात तीन सत्रात शाळा भरविण्याचे नियोजनही झाले होते. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी घेत शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवत अंग काढून घेतले आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात अद्याप एकही शाळा सुरु झालेली नाही. दरम्यान, ऑनलाईनची सवय नसलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता राहील का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools will not start in July