esakal | Breaking ! मार्च एंडपर्यंत राहणार शाळा बंद; 11 जिल्ह्यांमधील 410 विद्यार्थी तर 234 शिक्षकांना कोरोना

बोलून बातमी शोधा

School_Students}

बाहेरील कोरोनाने आता शाळांमध्ये शिरकाव केला आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील संपूर्ण शाळा मार्च एंडपर्यंत बंद ठेवल्या जातील, अशी शक्‍यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. 

Breaking ! मार्च एंडपर्यंत राहणार शाळा बंद; 11 जिल्ह्यांमधील 410 विद्यार्थी तर 234 शिक्षकांना कोरोना
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील 11 जिल्ह्यांमधील 410 विद्यार्थी तर 234 शिक्षक कोरोना बाधित आढळले आहेत. त्यात सामाजिक न्याय व समाज कल्याण विभागाअंतर्गतच्या शाळांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यातच कोरोना बाधित पुन्हा वाढू लागल्याने दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात आहे. तर बाहेरील कोरोनाने आता शाळांमध्ये शिरकाव केला आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील संपूर्ण शाळा मार्च एंडपर्यंत बंद ठेवल्या जातील, अशी शक्‍यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या आज (शुक्रवारी) जिल्हानिहाय आढावा घेणार असून, त्यात अंतिम निर्णय अपेक्षित आहे. 

वर्धा जिल्ह्यातील 98 मुले आणि आठ शिक्षक, हिंगोलीत सहा शिक्षक, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 33 शिक्षक, चंद्रपूर जिल्ह्यात एक विद्यार्थी व सहा शिक्षक, पालघर जिल्ह्यात 22 शिक्षक, सातारा जिल्ह्यातील 36 मुले आणि 121 शिक्षक कोरोना बाधित आढळले आहेत. तसेच जळगाव जिल्ह्यातील 21 शिक्षक, गोंदियामधील एक मुलगा आणि तीन शिक्षक, नांदेड जिल्ह्यातील दोन मुले तर आठ शिक्षक, वाशीममधील 229 मुले व चार शिक्षक आणि सोलापूर जिल्ह्यातील एका गतिमंद मुलांच्या शाळेतील तब्बल 43 मुले आणि दोन-तीन शिक्षक कोरोना बाधित आढळले आहेत. 

दुसरीकडे मागील 25 दिवसांत राज्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 1 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत पुण्यात सर्वाधिक 16 हजार 541, मुंबईत 13 हजार 541, नागपूर जिल्ह्यात 12 हजार 353, अमरावती जिल्ह्यात 11 हजार 412, ठाण्यात नऊ हजार 338, नाशिक जिल्ह्यात पाच हजार 843 रुग्ण सापडले आहेत. रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढलेल्या तथा वाढत असलेल्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, वाशीम, अकोला, औरंगाबाद, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा, रायगड, जालना, लातूर या जिल्ह्यांचाही समावेश आहे. 

25 दिवसांत वाढले एक लाख रुग्ण 
राज्यात खूप महिन्यांनंतर 1 फेब्रुवारीला कोरोनाचे सर्वांत कमी एक हजार 948 रुग्ण सापडले होते. तर 25 फेब्रुवारीला राज्यभरात तब्बल आठ हजार 702 रुग्ण आढळून आले. खास बाब म्हणजे 1 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत राज्यात दररोज चार हजार 100 च्या सरासरीने तब्बल एक लाख एक हजार 474 रुग्ण वाढले आहेत. दुसरीकडे, याच काळात दररोज 36 च्या सरासरीने 884 जण दगावले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्याचा दृष्टीने राज्यभर युद्धपातळीवर नियोजन सुरू झाले आहे. 

ठळक बाबी... 

  • राज्यात 1 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत वाढले एक लाख एक हजार 474 रुग्ण 
  • राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये 25 दिवसांत वाढले कोरोनाचे 90 हजार 899 रुग्ण 
  • मागील 25 दिवसांत मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे, अमरावती आणि नागपूर या सहा जिल्ह्यांमध्ये वाढले 69 हजार 28 रुग्ण 
  • राज्यातील 11 जिल्ह्यांमधील 234 शिक्षक तर 410 विद्यार्थी आढळले कोरोना बाधित 
  • वर्धा, हिंगोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, पालघर, सातारा, जळगाव, गोंदिया, नांदेड, वाशीम आणि सोलापूर जिल्ह्यामधील 644 शिक्षक व विद्यार्थी कोरोना बाधित 
  • शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची वाढली चिंता; सामाजिक न्याय व समाज कल्याण विभागाच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव 
  • शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आज घेणार जिल्हानिहाय ऑनलाइन आढावा बैठक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल