तीन मंत्र्यांच्या बैठकीत उपस्थित असलेले सोलापूर महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी कोरोनाबाधित 

प्रमोद बोडके
सोमवार, 29 जून 2020

दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मी उपस्थित होतो. या बैठकीत मी पूर्णवेळ मास्क वापरला. वारंवार सॅनिटायझरचाही वापर केला. या बैठकीला उपस्थित असलेले महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी कोरोनाबाधित असल्याने स्पष्ट झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मला होम क्वारंटाईन होण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे मी सध्या होम क्वारंटाईन झालो आहे. 
- संजयमामा शिंदे, आमदार, करमाळा 

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्याची चिंता वाढविणाऱ्या कोरोनाने आता जिल्हा प्रशासनाची, राज्याच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांचीही चिंता वाढविली. सोलापूर महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी कोरोनाबाधित असल्याचे रविवारी (ता. 28) समोर आले. गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता.27) आढावा बैठकीला या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावल्याने सोलापुरातील कोरोनाची चिंता आता जिल्हा प्रशासनासह राज्याच्या मंत्रिमंडळापर्यंतही पोचली आहे. 

महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी कोरोनाबाधित असल्याने रविवारी रात्री समोर आल्यानंतर आज दिवसभर सोलापूर शहर व जिल्हा प्रशासनात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. कोरोनाबाधित आलेले महापालिकेचे ते अधिकारी कोणा कोणाच्या संपर्कात आले आहेत. याचा शोध घेण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्यावतीने युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे.

या बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, मोहोळचे आमदार यशवंत माने, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित होते. सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आणणारी यंत्रणाच सध्या कोरोनाच्या धास्तीत सापडली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior officials of Solapur Municipal Corporation, who were present at the meeting of the three ministers, were corona possitive