'राज्यात ७२ पेक्षाही गंभीर दुष्काळ'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 मे 2019

 ‘‘सातारा, सोलापूर, बीड, नगर जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे व संपूर्ण दुष्काळी भागासाठी सर्वंकष निर्णय घ्यावेत,’’ अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

मुंबई -  ‘‘सातारा, सोलापूर, बीड, नगर जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे व संपूर्ण दुष्काळी भागासाठी सर्वंकष निर्णय घ्यावेत,’’ अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेचा रणसंग्राम संपताच सोलापूर, सातारा, बीड, उस्मानाबाद, नगर या दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर थेट जात आणि चारा छावण्यांतील शेतकऱ्यांच्या, मालकांच्या अडचणीशिवाय धनगर समाजातील प्रतिनिधींनी शेळ्या- मेंढ्यांकरिता चारा छावणीच्या धर्तीवर स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी केली. त्यांच्या दृष्टीने तो दिलासा ठरेल, असेही पवार यांनी पत्रात म्हटले आहे. 

शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या जाणून घेतलेल्या समस्या, त्यांच्या अडचणी यावर उपाययोजना काय करायला हव्यात, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात प्रत्येक मुद्दे आणि समस्या व दुष्काळावर काय उपाययोजना कराव्यात, याबाबतचे सविस्तर म्हणणे मांडले आहेत.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दुष्काळाबाबत चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी सुमारे अर्धा तास चर्चा केली.

Web Title: Serious drought in Maharashtra