लॉकडाउनमध्येही रोजगार ‘अनलाॅक’; सतरा हजार जणांना मिळाले काम

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 27 July 2020

गेल्या तीन महिन्यांत कौशल्य विकास विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाइन रोजगार मेळावे आणि महास्वयम वेबपोर्टलमार्फत तब्बल १७हजार७१५ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे.

मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. मात्र, असे असतानाही गेल्या तीन महिन्यांत कौशल्य विकास विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाइन रोजगार मेळावे आणि महास्वयम वेबपोर्टलमार्फत तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. या कालावधीत विभागाच्या विविध व्यासपीठांवर एक लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांनी नोंदणी केली असून, या सर्व उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी विभाग प्रयत्न करीत आहे, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले असून, त्यावर बेरोजगार उमेदवार नोंदणी करत आहेत; तर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्‌स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजकांमध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येत आहे, अशी माहिती मलिक यांनी यावेळी दिली. 

मागील तीन महिन्यांत एप्रिल ते जून अखेर या वेबपोर्टलवर २ लाख ७२ हजार १६५ इतक्‍या इच्छुक उमेदवारांनी नोकरीसाठी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन मेळाव्यात ४० हजार जण सहभागी
जिल्हास्तरावर मागील तीन महिन्यांत २४ ऑनलाइन रोजगार मेळावे पार पडले आहेत. या मेळाव्यांमध्ये १६७ उद्योजकांनी सहभाग घेतला असून, १६ हजार ११७ जागांसाठी त्यांनी ऑनलाइन मुलाखती घेतल्या व  ४०,२२९ तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत २,१४० तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरू आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही मंत्री मलिक यांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seventeen thousand people got jobs even in the lockdown