राज्यात ७३ टक्के साठा

प्रतिनिधी
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे सातत्याने ओसंडून वाहत आहेत; तर उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधूनही पाणी सोडावे लागत आहे. कोयना, उजनी आणि जायकवाडी ही तीनही धरणे भरली.

पुणे - मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे सातत्याने ओसंडून वाहत आहेत; तर उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधूनही पाणी सोडावे लागत आहे. कोयना, उजनी आणि जायकवाडी ही तीनही धरणे भरली.

पूर्व विदर्भातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असला, तरी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये मात्र अद्यापही पुरेशा साठ्याअभावी स्थिती चिंताजनक आहे. सोमवारी मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये १ हजार ५८ टीएमसी (७३ टक्के) पाणीसाठा झाला. गतवर्षी याच तारखेला सर्व प्रकल्पांमध्ये सुमारे ६५ टक्के पाणी उपलब्ध होते.

विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार करता यंदा मराठवाड्यात सर्वांत कमी ४० टक्के, तर पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात सर्वांत कमी ५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. पूर्व विदर्भातील नागपूर विभागात पाणीसाठ्याची स्थिती चांगलीच सुधारली असून, तब्बल ८३ टक्के पाणीसाठा झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागात ८७ टक्के, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागात ७८ टक्के आणि कोकण विभागात ९० टक्के पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालावरून  दिसून येते. 

बीड, हिंगोली, उस्मानाबादेत धरणे रिकामीच
जायकवाडी धरणाच्या अचल साठ्यात २६.०५ टीएमसी, तर चल साठ्यामध्ये ७६.६४ टीएमसी (१०० टक्के) असे एकूण १०२.७३ टीएमसी (१०० टक्के) पाणी आहे. येलदरी धरणात ६ टक्के, तर नांदेडच्या निम्न मनार धरणात १०० टक्के पाणीसाठा असला, तरी मराठवाड्यातील उर्वरित धरणांच्या पाणलोटात पावसाने ओढ दिल्याने बीड, हिंगोली, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यातील धरणे रिकामीच आहेत. विभागातील मोठ्या ४५ प्रकल्पांमध्ये ८९.१२ टीएमसी म्हणजेच ५६ टक्के उपयुक्त साठा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seventy three percentage water stock in the state