Shiv Sena चे धनुष्यबाणाचे चिन्ह आम्हालाच मिळेल; शंभूराज देसाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shambhuraj Desai statement Shiv Sena arrow symbol Shiv Sena  Balasaheb Thackeray satara

Shiv Sena चे धनुष्यबाणाचे चिन्ह आम्हालाच मिळेल; शंभूराज देसाई

सातारा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही वाटचाल करत असून, आमची शिवसेना ही मूळची आहे. आमच्या पाठीमागे बहुमत असल्याने आम्हाला दृढ विश्वास आहे, की धनुष्यबाणाचे चिन्ह आम्हालाच मिळेल, असा विश्वास उत्पादन शुल्कमंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. नियोजन समितीच्या बैठकीनंतर मंत्री देसाई यांनी नियोजन भवनात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘नियोजन समितीचे कोणतेच प्रस्ताव आम्ही आडवलेले नाहीत.

केवळ काही कामांच्या प्रस्तावात अंशत: बदल करणार आहोत. त्यासाठी लोकप्रतिनिधींचे प्रस्ताव घेतले जात आहे. येत्या मार्च २०२३ पर्यंत निधी खर्च झाला पाहिजे, हा आमचा उद्देश असेल. जिल्ह्यात ९२ टक्के लसीकरण पूर्ण झाले असून, साडेतीन लाख पशुधन जिल्ह्यात असून, त्यापैकी तीन लाख दहा हजार लसीकरण पूर्ण झाले आहे. आगामी काळात जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदारांना सोबत घेऊन त्यांच्या हातात हात घालून जिल्ह्याचा विकासाचा रथ पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असेल.’

न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे निकाल देण्याचा निर्णय दिला आहे, याविषयी देसाई म्हणाले, ‘‘आमची शिवसेना ही ओरिजनल शिवसेना असून, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांची मूळ शिवसेना आहे. आमच्याकडे ५६ पैकी ४० आमदार व १८ पैकी १२ खासदार आहेत. बहुतांशी जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य आमच्याकडे असल्याने बहुमत आमच्या पाठीशी असल्याने निकालही आमच्या बाजूने लागेल. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हही आम्हालाच मिळेल.’’

तुमच्यातील दुफळीचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे, असे विचारले असता ते म्हणाले, ‘‘आमच्यात भांडणे लावू नका. कुठल्याही परिस्थितीत नकारात्मक ऊर्जा येऊ देणार नाही. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत.’’