esakal | मनाचिये वारी : वैष्णवांची अवघी चिंता वाहते माऊली
sakal

बोलून बातमी शोधा

Vital Rukmini

मनाचिये वारी : वैष्णवांची अवघी चिंता वाहते माऊली

sakal_logo
By
शंकर टेमघरे

जेजुरी-वाल्ह्यादरम्यानची वाटचाल हा पालखी मार्गावर सर्वांत कमी अंतराचा टप्पा. मल्हारीगडाच्या कुशीत विसावलेला सोहळा भल्या पहाटेच मार्गाला लागतो. जेजुरी सोडताना सारे वारकरी मल्हारगडाकडे पाहात मनोमन दर्शन घेतात. पूर्वी पालखीचा गावठाणातच मुक्काम होता. मात्र, वाढत्या नागरिकरणामुळे तळ कमी पडू लागल्याने वेशीबाहेर नवीन तळ केला आहे. जेजुरीकरांना माऊलींच्या दर्शनाला अडचणीचे होऊ लागले आहे. पण, माऊलींच्या प्रेमाच्या ओढीने सारे तेथे येतात. मोठ्या तळाला सध्या तरी गावात जागा उपलब्ध नाही. त्यामुळे नाइलाज आहे.

पालखी मार्गावर सर्वांत चांगले न्याहारीचे ठिकाण म्हणजे दौंडज खिंड. परिसरातील भाविक वारकऱ्यांसाठी कपड्यात बांधून भाकरी, ठेचा, उसळ, पिठलं घेऊन येतात. कोवळ्या उन्हात न्याहरी करून वारकरी दुपारीच वाल्ह्यात पोचतात. वाल्हे दीड-दोनशे उंबऱ्याचे गाव. येथील आधीचा तळ गावातच होता. तोही कमी पडत होता. एका धनगर समाजातील दानशुरांनी गावाबाहेर मोठी जागा दान केली. त्यातून तेथे भव्य तळ उभा राहिला आहे. पालखी आली, की हे छोटे गाव एका दिवसासाठी काही पटीने वाढते. यंदा वारी रद्द झाल्याने गाव ओसाड पडले आहे. यंदा वाल्हे माऊलींचे गाव झालेच नाही. पालखी सोहळ्यात नेहमीच एक जाणवते. माऊली ज्या गावात जाते. त्या गावातील वातावरण चैतन्याने फुलून जाते. माऊली पुढे गेली, की मागील गावातील ओसाडपण नकोसे वाटते.

वाल्ह्यातील समाजआरतीत वारीतील शिस्तीची भाविक अनुभूती घेतात. चोपदारांनी चोप उंचावून ‘हो’ असे म्हणाले की, लाखो वारकऱ्यांचा टाळमृदंगाचा गजर एकदम शांत होतो. एखाद्या दिंडीत गजर सुरूच राहिल्यास समजायचे, त्या दिंडीला काहीतरी अडचण आहे. मग त्यांना आश्‍वासित केल्यानंतर त्यांचे टाळ बंद होतात. वाटचालीत कोणाचे काही हरवले असेल किंवा कोणाचे काही सापडले असेल; तर त्यांची यादी वाचली जाते आणि कोणाचे असेल, त्याने ओळख पटवून ते घेऊन जावे, असे पुकारले जाते. आरती होते. आरती झाली, की पालखी विसावते. या समाजआरतीमधील भाव बघितला तर असे जाणवते, पालखी तंबूत न जाता बाहेर थांबते, वारकऱ्यांच्या दिवसभरातील अडचणी समजावून घेते, त्याचे निराकरण झाले की मगच ती तंबूत विसावते. वारकऱ्यांबद्दल असलेली काळजी येथे अधोरेखित होते. आपल्यासमवेतच्या जिवांना काही समस्या असेल, तर ती दूर झाल्याशिवाय माऊली शांत तंबूत कसे बसेल. ही माऊलींची तळमळ वारीतील खरे अध्यात्म शिकवते. त्यातच लाखो वारकरी वीस दिवस कसे गुण्यागोविंदाने राहतात, याचे उत्तर यात सापडते. कारण वारकऱ्यांची काळजी वाहणारी ती माऊलीच असते.

वाल्हे गाव छोटे असले, तरी आम्ही वारकऱ्यांच्या सेवेत कधी कमी पडलो नाही. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून त्या सेवेत खंड पडल्याने गावात नैराश्याचे वातावरण आहे. आम्ही गुढ्या उभारून स्वागत करायचो. यंदा आम्ही तळावर प्रतिकात्मक पूजा केली. जेव्हा माऊलींच्या पादुका बसमधून पंढरीकडे जातात. तेव्हा आमचे गाव रस्त्यांच्या कडेला दर्शनासाठी उभे असते.

- अमोल खवले, सरपंच, वाल्हे

loading image