esakal | मनाचिये वारी : सकारात्मकतेचे भावप्रवाह
sakal

बोलून बातमी शोधा

Vittal Rukmini

मनाचिये वारी : सकारात्मकतेचे भावप्रवाह

sakal_logo
By
शंकर टेमघरे

माऊलींच्या पालखी सोहळ्यात पुणे जिल्ह्याचा प्रवास जेथे संपतो ते गाव नीरा. नदी ओलांडून पाडेगावच्या हद्दीत सातारा जिल्हा सुरू होतो. येथे सरकारी, पोलिस यंत्रणेचा आदानप्रदान कार्यक्रम होतो. पुणेकर माऊलींच्या सोहळ्याला निरोप देण्यासाठी येतात; तर सातारकर स्वागतासाठी. (Shankar Temghare Writes about Aashadhi Wari)

सोहळा नीरेत दुपारच्या जेवणासाठी थांबतो. येथे पूर्वी छोटा पूल होता. तेथून जाताना वाहने आणि सोहळा यांची मोठी कोंडी होत होती. परंतु, कालांतराने येथे नवीन पूल झाला. तेव्हापासून दिंड्यांची वाहने नव्या पुलावरून आणि वारकरी जुन्या पुलावरून नदी ओलांडतात. अनेक वारकरी नदीत अंघोळ्यांचा मनसोक्त आनंद घेतात. कपडे धुतात. दररोजच्या वाटचालीत दिंड्यांमध्ये सकाळची अंघोळ गडबडीतच करावी लागते. वारीत स्त्री-पुरुष भेद राहत नाही, याची अनुभूती येते. प्रत्येक जण इथे माऊली असतो. ही सारी मंडळी ‘माऊली’ या नामाच्या जगात जगत असतात. बहुतांश वारकरी घरी शॅावरखाली अभ्यंगस्नान करणारे असतात.

पण, वारीच्या वाटेने अशा स्वरूपातील अंघोळ काही सेकंदात होते, तेच अभ्यंगस्नान मानून वीस-बावीस दिवसांची वाटचाल करतात. वारीची ती परिस्थिती, ते माऊलीमय वातावरण, हेच वाटेने वारकऱ्यांचे जग बनते. इतके कष्ट करूनही माणसे पंढरीत जाऊन विठ्ठलाचे दर्शन कळसावरच घेऊन माघारी फिरतात. कळसाचे दर्शनच घ्यायचे, तर मग इतके पहाटे तीन वाजता उठून अंघोळ, पाण्यापावसाची वाटचाल करीत पंढरीत का जातात? काय मिळते त्यांना वारीतून? असा प्रश्न केवळ पहिल्याच वर्षी पडतो. कारण एकदा का तुम्ही वारीत आलात, की तुम्हीच माऊलीमय होऊन जाता. माऊलीनामाचा सकारात्मक प्रवाह चंद्रभागेपर्यंत अखंड वाहत राहतो. वारकऱ्यांमध्ये त्रास सहन करण्याची कमालीची ताकद असते. वारी पूर्ण करण्याची उमेद त्यांना ती ताकद देत असते. म्हणूनच एकदा वारी केली, की तुमचे वेगळे अस्तित्व राहत नाही. तुम्ही वारीमय होऊन जाता.

नीरा स्नान करून सोहळा लोणंदमध्ये मुक्कामी असतो. काही वर्षांपूर्वी लोणंदमध्ये माऊलींच्या पालखीचे आगमन आणि ईद एकाच दिवशी आली होती. मात्र, लोणंदमधील मुस्लीम बांधवांनी ईद दुसऱ्या दिवशी साजरी करण्याचा निर्णय घेतला. हीच माऊलींच्या प्रेमाची खरी ताकद आहे. ती जाती-धर्माच्या पलीकडचे आहे. यंदा कोरोनामुळे वारीच रद्द झाली. पण, एक चांगली गोष्ट पाहायला मिळतेय ती म्हणजे, मुक्कामाच्या ठिकाणी ग्रामस्थ पालखीच्या कट्ट्यांवर आपली भावना पूजा स्वरूपात व्यक्त करीत आहेत. वारी नसल्याने आजच्या वाटचालीत नीरा स्नान नव्हते. सारे यंदा चुकले म्हणून वारकरी नक्की हळहळत असणार. कारण कष्टमय असली, तरी वारीत प्रत्येक गोष्ट आनंददायी असते. त्यालाच तर म्हणतात, वारीचं गारूड...!

माऊलींचे आगमन आम्हा लोणंदनगरीवासीयांसाठी निश्चित आनंददायी असते. माऊलींच्या सहवासाने परिसराला पावित्र्य लाभते. यंदा वारी नसल्याने काही तरी चुकल्यासारखे वाटते.

- उत्तमराव सावंत, लोणंद

loading image