esakal | अजित पवारांवर प्रभाव टाकणारे, शरद पवारांच्या आयुष्यातील तीन प्रसंग

बोलून बातमी शोधा

sharad-pawar-ajit-pawar

​शरद पवारसाहेबांनी राजकारणाच्या धकाधकीतूनही मी,सुप्रिया,राजूदादा इतर सर्व भावंडे,सुना,नाती,जावई यांच्याकडं बारकाईनं लक्ष पुरवलं.आम्हा सर्वांना सुसंस्कारित आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी समर्थ बनवलं.

अजित पवारांवर प्रभाव टाकणारे, शरद पवारांच्या आयुष्यातील तीन प्रसंग

sakal_logo
By
अजित पवार

देशाच्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक, क्रीडा, सांस्कृतिकविश्‍वात ‘आख्यायिका’ बनलेल्या साहेबांना त्यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना माझ्या मनात भावभावनांचे तरंग उमटत आहेत. मी साहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्व, मुत्सद्दी राजकारण, दूरदृष्टी, सर्वच क्षेत्रांतील प्रतिभाशाली वावर, या पैलूंचा जवळून अनुभव घेतला आहे. दुर्दैवानं माझं पितृछत्र माझ्या बालवयातच हरपलं. त्यानंतर साहेबांनी माझा पित्याच्या मायेनं सांभाळ केला. माझ्यावर राजकीय, सामाजिक, कौटुंबिक, संस्कार केले; त्यामुळं साहेबांबद्दल माझ्या हृदयात एक हळवा कोपरा आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शरद पवारसाहेबांनी राजकारणाच्या धकाधकीतूनही मी, सुप्रिया, राजूदादा इतर सर्व भावंडे, सुना, नाती, जावई यांच्याकडं बारकाईनं लक्ष पुरवलं. आम्हा सर्वांना सुसंस्कारित आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी समर्थ बनवलं. साहेबांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य सदस्य असल्यानं अगदी बालवयापासून साहेबांच्या राजकीय, सामाजिक व्यक्तिमत्त्वाचे पैलू मला अनुभवायला मिळाले. साहेब ज्ञानानं, अनुभवानं समृद्ध विद्यापीठच आहेत. माझ्या पंचविशीत साहेबांनी मला त्यांचा राजकारणातील वारस बनण्याची पहिली संधी दिली. साहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा वारस म्हणून जनसामान्यांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा, साहेबांशी होणारी तुलना याचं प्रचंड दडपण मनावर होतं. त्यातूनच आपणही साहेबांसारखं स्वतःला सिद्ध करावं असा ध्यास मी घेतला. सर्व यातना, विकृत प्रवृत्तीबद्दलचा राग, दुःख यानं व्यथित न होता, त्याचा लवलेशही चेहऱ्यावर उमटू द्यायचा नाही, हे साहेबांचं कौशल्य आत्मसात करण्याचा मी खूप प्रयत्न केला. परंतु, मला त्यात अद्याप फार यश आलेलं नाही. साहेबांच्या जीवनातील राजकीय चढउतारांचा मी साक्षी आहे. माझ्यावर संकटं आल्यावर मी साहेबांना स्मरून अग्निदिव्यातून पार होण्याचा प्रयत्न केला आहे. साहेबांवर काही पत्रकारांनी, प्रसारमाध्यमांनी, विरोधकांनी चुकीचे; वस्तुस्थितीशी प्रतारणा करणारे आरोप केले. त्यामुळं व्यथित झालेले, परंतु संयम ढळू न दिलेले साहेब मी पाहिले आहेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कल्पनाशक्ती विकासाची
शेतकरी साहेबांचा श्‍वास आहे. फळबाग योजनेच्या रूपानं साहेबांनी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली. कृषिमंत्रिपद घेऊन त्यांनी विक्रमी अन्नधान्य निर्मितीच्या, शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणण्याच्या योजना प्रभावीपणे राबवल्या. त्यांची विकासाची विलक्षण कल्पनाशक्ती कार्यकर्त्यांची प्रेरणा आहे. उपेक्षित, वंचित, कष्टकरी, दुर्बल घटकांना न्याय देण्याबाबत अनेक पुरोगामी निर्णय त्यांनी घेतले. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर केलं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज, शाहू-फुले-आंबेडकरांचा वैचारिक वारसा स्वतःच्या कृतीतून जपला. त्यांच्याच सूचनेनुसारच महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील विविध वस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याचा निर्णय नुकताच घेतला. साहेबांकडून मी शासकीय यंत्रणेला आदेश देण्यापेक्षा थेट मैदानात उतरून शासकीय यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत करणं शिकलो. लातूरचा भूकंप असो किंवा मुंबईचा बॉम्बस्फोट, तत्काळ घटनास्थळी पोचून, ‘योद्धा’ बनून, साहेबांनी बाधितांना दिलासा दिला. आजही ८०व्या वर्षी तीन पक्षाचं सरकार चालवताना राजकीय मुत्सद्देगिरी पणाला लावण्याबरोबरच अवकाळी पाऊस, वादळं, कोरोनासारखी महामारी अशा नैसर्गिक संकटात स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता साहेब मैदानात उतरतात.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दांडगा लोकसंग्रह बलस्थान
साहेबांचा शेती, सहकार, क्रीडा, साहित्य, उद्योग, संरक्षण, कला अशा अनेक क्षेत्रांत असलेला व्यासंग माझ्या कुतूहलाचा विषय आहे. साहेबांच्या महिलांविषयक पुरोगामी धोरणांतून मला नेहमी उदात्ततेचं, व्यापक विचारांचं, दूरदर्शीपणाचं दर्शन झालं. महिलांना नोकरीत  टक्के आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांत आरक्षण, वडिलोपार्जित संपत्तीत वाटा, पहिलं महिला धोरण, बचतगट चळवळ, महिलांना तिन्ही सैन्यदलांत काम करण्याची संधी या निर्णयामुळं महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून राज्य व देशाच्या विकासात साहेबांनी मोलाची भूमिका बजावली आहे. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा वारसा साहेबांनी काटेकोरपणे जोपासला आहे आणि ‘राष्ट्रवादी’च्या प्रत्येक कार्यकर्त्यांकडून तो जोपासला जाईल, यासाठी जातीनं लक्ष पुरवलं आहे. सर्वात तरुण युवक काँग्रेस अध्यक्ष, सर्वात तरुण मुख्यमंत्री अशा एक ना अनेक बिरुदावल्या दिमाखात मिरवत साहेबांनी सामाजिक जीवनाची षष्ट्यब्दीपूर्ती केली. आता ऐंशीव्या वर्षी तरुणांच्या गळ्यातील ताईत बनण्याची किमयाही त्यांनी साधली आहे. साहेबांचा दांडगा लोकसंग्रह हे मोठं बलस्थान आहे. त्यांनी लाखो संसार उभे केले आहेत. त्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो.

कुटुंबाचेही आधारवड!
साहेबांनी आपल्या कुटुंबीयांकडं कधीही दुर्लक्ष केलं नाही. आमच्या आजी, म्हणजे शारदाबाई पवार यांच्याबद्दल साहेबांना अत्यंत आदर आहे. यंदाच्या दिवाळीत आपल्या स्वर्गीय मातोश्रींना लिहिलेल्या पत्रातून त्यांच्या मातृभक्तीचं विलक्षण दर्शन झालं. विरोधक आणि प्रसारमाध्यमांनी कितीही बागुलबुवा उभा केला, तरी त्यांच्या कल्पनेतलं ‘महाभारत’ पवार कुटुंबात कधीही घडणार नाही. हे बंध अधिक दृढ करण्याचं श्रेय आमच्या सौ. प्रतिभाकाकींना आहे. या माऊलीने आम्हा सर्व भावंडांवर, पक्षाच्या कार्यकर्त्यावर आईच्या मायेनं प्रेम केलं. साहेबांचं कर्तृत्व फुलविण्यात काकींचा मोठा वाटा आहे. माझ्या राजकीय, सामाजिक जडणघडणीत साहेबांचे संस्कार झाले. त्यांच्या सहवासातून मला विकासाची दृष्टी मिळाली. साहेबांची विकासाची दूरदृष्टी, दुर्दम्य इच्छाशक्ती, चाणक्‍य मुत्सद्देगिरी, संकटातही घट्ट पाय रोवून उभं राहण्याची वृत्ती आणि या गुणांचा राज्य आणि राष्ट्राच्या विकासासाठी झालेला उपयोग असंख्य कार्यकर्त्यांसाठी अनुकरणीय आदर्श आहे.

***************************************

प्रभाव टाकणारे तीन प्रसंग
साहेबांची ‘लार्जर दॅन लाइफ’ ही प्रतिमा माझ्या मनात घट्ट झाली ती तीन प्रसंगांनी. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साहेबांनी केलेली स्थापना. 

साहेबांनी यमाला अक्षरशः दारातून हाकलून लावलं तो काळ. सन २००४च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान साहेबांना तोंडाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. तीन ऑपरेशन झाली; मात्र ते अविचल होते. आशावाद आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी यमाला अक्षरशः उंबरठ्यावरून परत पाठवलं. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत साहेबांच्या अत्युच्च धैर्याचं झालेलं दर्शन. भाजपच्या प्रचारानं इतर सर्व पक्ष पराभवाच्या मानसिकतेत असताना साहेब या वयातही तरुणासारखे प्रचारासाठी फिरले, पावसात भिजले! काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना उभारी दिली. भिन्न विचारधारांच्या पक्षांना ‘समान कार्यक्रमा’च्या आधारावर एकत्र आणलं. महाविकास आघाडीला एकत्र ठेवणारं सूत्र स्वतः बनले!

***************************************