पवारांची गुगली अन् फडणवीसांची कोपरखळी

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 31 July 2019

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने पाच वर्षे काम नव्हते. त्यामुळे वेळ होता म्हणून पुस्तक लिहू शकलो. पण आता असा रिकामा वेळ नको.
- हर्षवर्धन पाटील, काँग्रेसचे नेते

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज विधानभवनात आयोजित कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी रंगली आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्याला दादही मिळाली. 

‘माझ्या घशाची व जिभेची छोटी शस्त्रक्रिया झाली. डॉक्‍टरांनी कार्यक्रम करू नका म्हणून सांगितले. पण मुख्यमंत्र्यांच्या सोबत विधानभवनातला कार्यक्रम टाळला असता तर तर्कवितर्क लढवले असते. गिरीश महाजन यांच्यासोबत मी अमित शहांच्या भेटीला गेल्याच्या बातम्या झाल्या असत्या,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी गुगली टाकताच उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांमध्ये हशा पिकला. 

त्यावर, ‘सध्या कोण कोणत्या पक्षात जात आहे हे आम्हाला पण माहीत नाही. वृत्तपत्रात अमुक नेता भाजपमध्ये जाणार ही बातमी वाचून आम्हाला कळते,’ अशी कोपरखळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली. 

विधानभवनात आज माजी विधिमंडळ मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ‘विधानगाथा’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ही जुगलबंदी रंगली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार सध्या पक्षांतर करत आहेत. अशा वेळी शरद पवार व मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील यांनी विधिमंडळ कामकाज मंत्री म्हणून उत्तम कामिगरी सांभाळल्याचे कौतुकोद्‌गार या वेळी नेत्यांनी काढले. 

हर्षवर्धन पाटील यांनी शिवसेना-भाजपचे अनेक सदस्य निलंबित केले. त्यामुळे त्यांना आम्ही ‘निलंबन मंत्री’ म्हणायचो, असे नमूद करत, कितीही टोकाचा वाद झाला तरी आम्ही त्यांच्याच दालनात जाऊन भडंग खायचो, अशी आठवण फडणवीस यांनी सांगितली. 

शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या कामगिरीचे कौतुक केले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही मार्मिक टोला लगावत, ‘या कार्यक्रमात गिरीश महाजन समोर बसले आहेत,’ असे सूचक विधान केले. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांनीही हर्षवर्धन पाटील यांना आगामी विधानसभेत आमदार म्हणून निवडून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar Devendra Fadnavis Politics