Sharad Pawar : अतिवृष्टीचा प्रश्‍न सरकारकडे मांडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad pawar

Sharad Pawar : अतिवृष्टीचा प्रश्‍न सरकारकडे मांडणार

परिंचे : ‘‘महाराष्ट्रासह पुरंदर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा प्रश्न केंद्र व राज्य सरकारकडे मांडणार असून, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली असून, आमदार व खासदारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,’’ अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त दिली.

परिंचे (ता. पुरंदर) येथे शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी शेती, फळबागा, पाणी, विमानतळ, रेल्वे, रोजगार आदी विषयांवर विचारलेल्या प्रश्नांनी पवार यांनी उत्तर दिली. ते म्हणाले, ‘‘देशाचे कृषिमाल निर्यात धोरण वारंवार बदलत असल्याने इतर देशांना मागणीनुसार शेतीमाल पोचवणे शक्य होत नाही.

शेतकऱ्यांसाठी भूविकास बॅंकेची कर्ज माफी, ही शिंदे सरकारची फसवी घोषणा असून, गेल्या दहा वर्षांत एकही शेतकऱ्याला या बॅंकेकडून कर्ज पुरवठा झाला नाही. मी केंद्रीय कृषिमंत्री असताना राबवलेल्या फळबाग योजनेमुळे कोकणातील तरुणांचे मुंबईला नोकरीसाठी स्थलांतरित होण्याचे प्रमाण कमी झाले. अतिवृष्टी झाली आणि नुकसान झाले, तरी पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणात वाढणार असून, भविष्यात त्याचा फायदा होणार आहे. पुरंदरमधून गेल्या वर्षी पाच लाख टन ऊस सोमेश्वर कारखान्यात गाळपासाठी गेला. कारखान्याने शिक्षण करापोटी पुरंदरमधील शेतकऱ्यांकडून जमा केलेल्या रकमेतून तालुक्यातील मुलींच्या शिक्षणासाठी सुविधा पुरवल्या पाहिजेत.,’’ असे पवार यांनी सांगितले.

‘कोणी सांगितले, मी म्हातारा झालोय?’

‘साहेब, तुम्ही आता म्हातारे झाला आहे, तुम्ही एका जागेवर बसून फक्त रिमोट कंट्रोल दाबा आम्ही यंत्रणा हालवतो,’ असे एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने सांगताच शरद पवार म्हणाले, ‘कोणी सांगितले, मी म्हातारा झालोय? तुम्ही काय पाहिलंय?’ असे म्हणताच हशा पिकला.

पुरंदरमध्ये होणारे विमानतळ ही महाराष्ट्राची गरज नसून, देशाची गरज आहे. कमीत कमी शेतकऱ्यांचे नुकसान होईल, याचा विचार करून विमानतळ केले जाणार आहे.

- शरद पवार, ज्येष्ठ नेते