पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि वानखेडेवर मॅच बघायला निघून गेले

शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्याचा किस्सा.
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSAKAL

 शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झालाय. जवळपास ५० बंडखोर आमदारांना घेऊन ते गुवाहाटी येथे मुक्काम ठोकून होते. शिवसेनेकडून गेले अनेक दिवस त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले पण त्यात यश मिळाले नाही. अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यांनी यापूर्वीच मुख्यमंत्रीपदाचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगला सोडला होता. आज मात्र त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सर्व सूत्रे खाली ठेवली.(Maharashtra Political Crisis Update)

शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्याचा किस्सा, सत्तरच्या दशकातला काळ. पवारांनी वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून बंडखोरी करून पुलोद सरकार स्थापन केलं होतं. या सरकारला केंद्रात असलेल्या जनता सरकारचा आशीर्वाद होता. आणीबाणीनंतरच्या काँग्रेसविरोधी भावनेतून हे सरकार अस्तित्वात आलं होतं. महाराष्ट्रात देखील शरद पवारांनी जनता पक्ष, जनसंघ अशा अनेक पक्षांची मोट हि काँग्रेस विरोधी विचारातून बांधली होती. पण टोकाच्या विचारधारेचे हे पक्ष फार काळ एकत्र राहणे अवघड होतं. लवकरच केंद्रातील जनता पक्षाचं सरकार कोसळलं. लोकांनी देखील काँग्रेसच्या पाठीशी राहायचं ठरवलं आणि इंदिरा गांधी लोकसभा जिंकून ऐटीत पंतप्रधान पदी परतल्या.

पंतप्रधान बनल्यावर इंदिरा गांधी यांनी सर्व बिगरकाँग्रेसी सरकारे बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या बाबतीत मात्र त्यांनी सबुरीचं धोरण स्वीकरलं होतं. सर्वप्रथम त्यांनी मुख्यमंत्री शरद पवार यांना दिल्लीला भेटायला बोलावलं. संजय गांधी यांच्या सोबत काम करण्याची ऑफर देखील दिली. मात्र शरद पवार यांनी काँग्रेस मध्ये परतण्यास नकार दिला. इंदिरा गांधी नाराज झाल्या. त्यांनी पवारांच सरकार बरखास्त करण्याची तयारी सुरु केली. शरद पवार आपल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात याबद्दलचा किस्सा सांगितला आहे.

ते सांगतात, मी मुंबईत परतलो. तो शनिवार होता. माझे उद्योगपती. मित्र माधवराव आपटे आणि त्यांच्या पत्नी, श्री. व सौ. नसली-नाडिया, श्री. व सौ. अरुण डहाणूकर डहाणूकर अशा स्नेह्यांच्या बरोबर आरे कॉलनीत दिवसभर गप्पागोष्टी झाल्यावर उशिरा घरी आलो. तो दिवस 'खग्रास सूर्यग्रहणा'चा असल्यामुळे 'ग्रहण कुणाला लागणार' यावर आमच्यात चर्चाही झाली होती. रात्री बाराच्या सुमाराला राज्याचे मुख्य सचिव एल. एस. लुल्ला माझ्याकडे आले. 'पुलोद'च सरकार बरखास्त करण्यात आल्याचा आदेश त्यांनी वाचून दाखवला. इंदिराजींची आणि माझी भेट झाल्यापासून अठ्ठेचाळीस तासांत हा निकाल आला होता. नव नेतृत्व स्वीकारण्याचा त्यांचा प्रस्ताव मी फेटाळला होता. मला एक संधी देऊन बघण्याची त्यांची इच्छा होती, असे म्हणता येईल. ही संधी मला घ्यायची नव्हती, हेही तितकंच खरं,

सरकार बरखास्तीमुळे साहजिकच शरद पवार हे मुख्यमंत्रिपदावरूनही पायउतार झाले. ते म्हणतात मुख्यमंत्रिपदी नसताना सरकारी निवासस्थानात राहणं माझ्या स्वभावात नव्हत. माझ्या आयुष्यात एक पथ्य मी कायम पाळत आलो आहे. ज्या-ज्या वेळी माझी मंत्रिपदं गेली, त्या-त्या वेळी मी चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांत सरकारी निवासस्थान सोडून दिलं आहे. माझ्या सगळ्या उद्योगपती मित्रांना निर्णय कळला.

त्यांनी, व त्यांची पत्नी प्रतिभा पवार यांनी मिळून सामान आवरलं आणि पुन्हा 'माहेश्वरी मॅन्शन मधे राहायला गेले. दुसऱ्या दिवशी वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटची टेस्ट मॅच होती. पवारांकडे तेव्हा जुनी फियाट होती. सरकारी गाडी गेली होती त्यामुळे स्वतःच ड्रायव्हिंग करत शरद पवार आपल्या फियाटमधून पत्नीसह स्टेडियमवर गेले. समालोचकानं ते आल्याचं जाहीर करतात अख्या स्टेडियमनं उभं राहून त्यांचं स्वागत केलं. शरद पवार सांगतात, मुख्यमंत्रिपद गेल्यावरसुद्धा मिळालेली ही मानवंदना मनावर कायमची कोरली गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com