मराठा आरक्षणप्रश्‍नी दोन्ही छत्रपतींनी पुढाकार घ्यावा : शरद पवार 

Sharad Pawar
Sharad Pawar

पंढरपूर (सोलापूर) : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सातारचे खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकून हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी आज दिला. 

पंढरपूर येथील माजी आमदार सुधाकर परिचारक, प्रसिद्ध कीर्तनकार रामदास महाराज जाधव (कैकाडी), जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी श्री. पवार पंढरपूरला आले होते. भेटीनंतर आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली. 

खासदार पवार म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडे आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. अशातच उदयनराजे आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी दोन वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत. यावर शरद पवारांना विचारले असता, त्या दोन्ही छत्रपतींनी आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे स्पष्ट केले. 

मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. सातारचे उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज हे दोन्ही खासदार भाजप पुरस्कृत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिफारशीनेच त्यांची राज्यसभेत निवड झाली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या दोन्ही छत्रपतींनी पुढाकारा घ्यावा. केंद्रातील मोदी सरकारवर त्यांनी दाबव टाकून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. 

कृषी विधयेकाच्या विरोधात विविध राज्यांनी वेगवेगळी भूमिका घेतली आहे. उत्पादन खर्चाचा विचार करून शेतीमालाला किंमत देण्याचे धोरण सरकारने चालू ठेवावे. केंद्राने कांद्यावर घातलेली निर्यातबंदी उठवण्याची गरज आहे. शेती विधयेकामध्ये दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. विधेयकासंदर्भात सगळ्या विरोधी पक्षांना एकत्रित करून काय निर्णय घेता येईल याचाही विचार सुरू असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. 

रामदास आठवलेंचा राज्यात साधा एकही आमदार नाही की केंद्रात खासदार देखील नाही. त्यांचं सभागृहात कोणी ऐकत नाहीच, परंतु बाहेर देखील कोणी महत्त्व देत नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी आज पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना रामदास आठवलेंच्या व्यक्तव्याची खिल्ली उडवली. 

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील एनडीए सरकारला पाठिंबा देत, महाराष्ट्रात भाजपला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करावे, असे विधान केले होते. त्यावर आज शरद पवार यांनी त्यांच्या विधानाला फारसे महत्त्व न देता उलट त्यांच्या या विधानाची खिल्ली उडवली. 

खासदार पवार म्हणाले, रामदास आठवले यांच्या मताला फारशी किंमत उरली नाही. ते काहीही बोलत असतात. सभागृहात कोणीही त्यांचे ऐकत नाही. शिवाय बाहेर देखील कोणी त्यांचे मत कोणी गांभीर्याने घेत नाही. ते नेहमी असे मार्गदर्शन करतात. त्यामुळे त्यांच्या या विधानाला मी फार महत्त्व देत नाही, असे सांगत, एनडीएत आपण सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले. 

या वेळी आमदार भारत भालके, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माजी आमदार दीपक साळुंखे, राष्ट्रवादी किसन सभेचे जिल्हाध्यक्ष प्रा. मारुती जाधव आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com