कोरोनाचा आढावा घेण्यासाठी शरद पवार रविवारी सोलापुरात 

प्रमोद बोडके
Friday, 17 July 2020

खासदार शरद पवार यांचा रविवारचा सविस्तर सोलापूर दौरा अद्याप आलेला नाही. खासदार पवार यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे देखील उपस्थित राहणार आहेत. कोरोनाची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह अथवा नियोजन भवन या ठिकाणी होण्याची शक्‍यता आहे. 
- बळिराम साठे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, सोलापूर 

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोलापूर शहर व परिसरातील काही गावांमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सोलापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार रविवारी (ता. 19) सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. 

सोलापूर जिल्हा आणि शरद पवार यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे नाते आहे. दुष्काळ असो की इतर कोणतेही संकट सोलापूरकरांच्या मदतीला शरद पवार धावून येत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. सोलापूर जिल्ह्यात विशेषतः: सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. सोलापुरातील कोरोना स्थितीचा व कोरोना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार पवार रविवारी सोलापुरात येत आहेत. 

जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील कोरोना रोखण्यासाठी खासदार शरद पवार जिल्हा प्रशासनाला काय सूचना देतात? राज्याच्या मदतीसोबतच केंद्र सरकारची काही मदत सोलापूरला देण्यासाठी खासदार पवार काही निर्णय घेतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आतापर्यंत जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरचा दौरा केला आहे. पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे आठवड्यातून एकदा सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. 
 

पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केली होती विनंती
खासदार पवार यांनी सोलापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी सोलापूरचा दौरा करावा अशी विनंती पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केली होती. त्यानुसार हा दौरा होत आहे. सोलापूरच्या लॉकडाऊनबाबतही पालकमंत्री भरणे यांनी खासदार पवार यांना कल्पना दिली होती. सोलापूरच्या लॉकडाऊनबाबत जाब विचारल्याच्या सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट चुकीच्या आहेत. 
- संतोष पवार, कार्याध्यक्ष, सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar in Solapur on Sunday to review the corona