शरद पवार यांचे सोलापूर जिल्ह्यावर पुन्हा एकदा लक्ष 

सुनील राऊत
Sunday, 19 July 2020

शिवरत्न बंगलाऐवजी शिवतीर्थ बंगल्यावर खलबते 
माळशिरस तालुक्‍यात प्रथमच शिवरत्न बंगला ऐवजी शिवतीर्थ बंगल्यावर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा आणि भावी राजकारण यावर सांगोपांग चर्चा झाली. बदलत्या राजकारणाची ही झलक असल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा सरहद्दीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक कार्यकर्ते अक्षय भांड व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन देऊन सर्व मान्यवरांचा सत्कार केला. 

नातेपुते (सोलापूर) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माळशिरस तालुक्‍यासोबतच संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची विस्कटलेली घडी पुन्हा नव्या जोमाने बसवायचे मनोमन ठरवले असल्याचे आजच्या श्री. पवार यांच्या दौऱ्यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 
सोलापूर जिल्ह्याची घडी बसवताना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा अभेद्य बालेकिल्ला असणारा माळशिरस तालुका ही आपल्या कह्यात घेता यावा यासाठी मोहिते-पाटील विरोधकांना सर्व ती ताकद द्यायची हे वेळोवेळी स्पष्ट दिसून येऊ लागले आहे. तालुक्‍यातील पवार कुटुंबाशी एकनिष्ठा असणारे सामान्य कार्यकर्ता म्हणजे रमेश पाटील. त्यांच्या वडिलांचे निधन झाले म्हणून त्यांचे सांत्वन करण्यासाठी दस्तुरखुद्द शरद पवार आज त्यांच्या वाड्यावर आले. त्यांच्यासोबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आदी मान्यवर उपस्थित होते. कण्हेर येथील भेटीनंतर सोलापूरला जात असताना वाटेत सदाशिवनगर येथे सहकार महर्षी मोहिते-पाटील यांचे ज्येष्ठ सहकारी कै. ज्ञानेश्वर सालगुडे पाटील यांच्या बंगल्याला ही भेट दिली. त्यावेळी त्यांचे चिरंजीव भानुदास सालगुडे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले व सदाशिवनगर येथील श्री. शंकर सहकारी साखर कारखाना चार वर्षे झाले बंद आहे, तो सुरु करावा अशी विनंती केली. त्यानंतर माळशिरस येथे डॉ. रामदास देशमुख व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस शंकर देशमुख या बंधूंच्या शिवतीर्थ बंगल्यात कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. चहापानानंतर कौटुंबिक चर्चा होऊन सदाशिवनगरच्या कारखान्याबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक लावू व श्री शंकर साखर कारखाना कसा चालू होईल, असा प्रयत्न करण्याचे कबूल केले. उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले की, या भागातील हजारो शेतकऱ्यांचा गाळपाअभावी उभा ऊस राहू शकतो. हा कारखाना सुरू होणे गरजेचे आहे, साहेब आपण प्रयत्न करावा, अशी विनंती केली. श्री. पवार यांनीही राजकीय प्रतिष्ठा बाजूला ठेवून हा कारखाना सुरू होण्याबाबत मी वैयक्तिक लक्ष घालेल असे सांगितले. 
यावेळी माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, संकल्प डोळस, माजी सभापती मच्छिंद्र ठवरे, तालुका अध्यक्ष माणिक वाघमोडे, भानुदास सालगुडे पाटील, विलास आद्रट, प्रभाकर इंगळे, हंसराज माने पाटील, सुजयसिंह माने पाटील, श्रीराम शिक्षण संस्थेचे करण पाटील, अभिषेक पाटील, आप्पासाहेब वाघमोडे, साहेबराव देशमुख, शुभांगी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawars attention once again on Solapur district