Warishe Murder Case : अपघात नव्हे, वारीशेंवरील हल्ला पूर्वनियोजित; आरोपीने दिली कबुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

journalist shashikant warishe murder case pandharinath Amberkar confessed that it was a pre-planned act report

Warishe Murder Case : अपघात नव्हे, वारीशेंवरील हल्ला पूर्वनियोजित; आरोपीने दिली कबुली

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे. विरोधी पक्षांनी हे प्रकरण चांगलेच उचलून धरले असून या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली. यादरम्यान या प्रकरणात आता मोठा खुलासा समोर आला आहे.

वारीसे यांच्या मृत्यू प्रकरणात संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर हा सध्या पोलिस कोठडीत आहे. आता आंबेकर यांनी वरीशे यांच्यावरील हल्ला हा पुर्वनियोजित असल्याचे मान्य केले आहे.

दरम्यान या प्रकरणाच्या तपासासाठी 11 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. पोलिस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली हा तपास होणार आहे . अशी माहिती रत्नागिरीचे एसपी धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान आंबेरकरला मंगळवारी राजापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

आंबेरकरला अटक केलेल्या राजापूर पोलिसांनी बुधवारी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आह. सुरुवातीला आंबेरकर याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली..

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार या प्रकरणी अटकेत असलेल्या आंबेरकरने गुन्ह्याची कबुली दिली. सोबतच आंबेरकर याने पत्रकार वारीशे यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कृत्य असल्याचे मान्य केले आहे. तसेच आम्हाला त्याचे बँक खाते तसेच कॉल रेकॉर्डचे तपशील मिळाले आहेत. या कृत्यात आणखी काही लोक गुंतले आहेत का हे तपासण्यासाठी आम्ही त्याची छाननी करत आहोत. असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

ते पुढे म्हणाले, आम्हाला यापूर्वीच्या प्रकरणांची आणि आरोपींविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारींचीही माहिती मिळाली आहे. त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे… रिफायनरी विरोधी कार्यकर्त्यांना धमकावणे आणि मारहाण करणे. कारण तो रिफायनरी समर्थक होता आणि प्रकल्पासाठी भूसंपादन सोपे व्हावे यासाठी काम करत असे. आम्ही या मागील प्रकरणे आणि तक्रारी पाहतो आहोत असेही त्यांनी सांगितेल.

नेमकं काय घडलं?

राजापूर येथे रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत शंकर वारीशे (वय ४५ वर्षे, रा. कशेळी) यांचा अपघात झाला होता. यापूर्वी पत्रकार वारीशे यांची 'मुख्यमंत्री शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री फडणवीसजी महोदय, आपल्यासोबत कुणाचे फोटो? शहानिशा कराच…; पंतप्रधान मोदीजींसह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या 'बॅनर'वर गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे फोटो, रिफायनरी विरोधी शेतकऱ्यांचा सनसनाटी आरोप' अशा मथळ्या खाली महानगरी टाइम्स या स्थानिक वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती.

यानंतर अगदी काही तासांतच पत्रकार शशिकांत वारिशे यांचा अपघाती मृत्यू झाला. अपघात झाला ती गाडी जिल्ह्य़ात प्रस्तावित केलेल्या तेल शुद्धीकरण कारखान्याचा समर्थक आंबेरकर याची होती. तेव्हापासून मृत्यू अपघाती झालेला नसून, ही ठरवून करण्यात आलेली हत्या असल्याचा आरोप होत आहे.