
Ajit Pawar : सरकारची जाहिरातबाजी निव्वळ उधळपट्टी - अजित पवार
मुंबई : सध्या शिंदे-फडणवीस सरकारची सुरू असलेली जाहिरातबाजी तारतम्य सोडून तर आहेच पण जनतेच्या पैशाची निव्वळ उधळपट्टी असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी केली. राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पवार म्हणाले की, राज्यात सध्या जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे; त्यात काही ठिकाणी खुर्च्या रिकाम्या दिसत आहे. त्याची छायाचित्रे प्रसिद्ध होत आहेत. कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. प्रसारमाध्यमांमध्ये जाहिराती प्रसारित केल्या जाणाऱ्या जाहिराती अतिशय चुकीच्या व खोट्या आहेत. सरकारने न घेतलेल्या निर्णयाचे श्रेय लाटत या जाहिराती दाखवून जनतेची फसवणूक केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, सरकारच्या काही जाहिरातींचा दाखला अजित पवार यांनी दिला. ‘एका जाहिरातीत दोन तरुणी चर्चा करत आहेत. ‘सरकारने संजय गांधी निराधार योजना सुरू केली आहे. त्यापासून शेतकरी बेरोजगारांना लाभ मिळतो, असे या जाहिरातीत दाखवले असून योजनेबाबतची कागदपत्रे एकाच ठिकाणी एक खिडकीवर मिळणार आहे, असे सांगण्यात येते.
मात्र, वास्तविक ही योजना माजी मुख्यमंत्री अ.र.अंतुले यांच्या काळात सुरू झाली होती. आता या योजनेतून फक्त ६५ वर्षावरील लोकांना याचा लाभ मिळतो. त्यामध्ये विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, तृतीयपंथी यांना शासकीय अधिकाऱ्यांच्या दाखवल्यानंतरच त्या योजनेचा फायदा मिळतो.
पण सरकारच्या जाहिरातीत दोन तरुण मुली योजनेची चर्चा करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. ‘हे काय चाललं आहे. इतके धादांत खोटे मांडले जात आहे, असे ते म्हणाले. एका जाहिरातीचा उल्लेख करताना पवार म्हणाले की, ‘आम्हाला शिकून नोकऱ्या नाहीत,’ अशी चर्चा जाहिरातीत चार - पाच सुशिक्षित तरुण चर्चा करत आहेत.
त्यात एक क्रिकेटपटू चेंडू त्यांच्याकडे भिरकावतो आणि त्यांच्यामध्ये येऊन विचारपूस करतो तुम्हाला रोजगार आहे. सरकारच्या रोजगार हमी योजनेंतर्गत काम मिळू शकते. पण सरकारची रोजगार हमी योजना कुणाकरता आहे?, असा सवाल करत जी योजना निरक्षर मजुरांसाठी आहे, त्या योजनेचा लाभ मिळतो, असे सुशिक्षित तरुण सांगत आहेत, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
राज्यात सर्वच विभागात बदल्यांचा बाजार तेजीत आहे. वनविभागाच्या बदल्यांमध्ये तर प्रचंड भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या सध्या येत आहेत. बदल्या करून काही मंत्री व अधिकारी परदेशात गेले आहेत. बदल्या होणे आणि यांनी परदेशात जाणे हा योगायोग आहे का, हा एक संशोधनाचा भाग आहे.
- अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते