Sanjay Shirsat: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; उपचारासाठी मुंबईला रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Shirsat: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; उपचारासाठी मुंबईला रवाना

Sanjay Shirsat: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; उपचारासाठी मुंबईला रवाना

एकनाथ शिंदे यांच्या बंडात साथ देणारे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. संजय शिरसाट यांना औरंगाबादहून उपचारासाठी मुंबईला आणण्यात आलं आहे. एअर अंबुलन्सने संजय शिरसाट यांना मुंबईला रवाना करण्यात आलं आहे. काल दुपारपासून त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी तातडीने उपचारासाठी त्यांना मुंबईला रवाना करण्यात आले आहे.

संजय शिरसाट यांची प्रकृती स्थिर असून त्यांना माइल्ड अटॅक आला होता असं सिग्मा हॉस्पिटलच्या टाकळकर डॉक्टरांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत होतं. औरंगाबादच्या सिग्मा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू होते. त्यानंतर आता काही वेळापूर्वी त्यांना एअर अंबुलन्सने मुंबईला रवाना करण्यात आलं आहे. लीलावती रुग्णालयामद्धे त्यांच्यावर उपचार करण्यात येतील अशी माहिती मिळत आहे.

औरंगाबाद विधानसभा पश्चिमचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांना यांना छातीत त्रास होत असल्याने आज सकाळी तातडीने मुंबईला हलवण्यात आले आहे. शिरसाट यांना मंगळवारी सकाळीच एअर अॅम्बुलन्सने मुंबईला रवाना करण्यात आले. त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही त्यांची लिलावतीमध्ये भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे

रक्तदाबाचाही त्रास

याबाबत सकाळ प्रतिनिधीने शिरसाट यांच्या स्वीय सहायकाशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून संजय शिरसाट यांच्या छातीत दुखत होते. त्यामुळे औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयात शिरसाट यांची तपासणी करण्यात आली होती. तपासणीतून संजय शिरसाट यांना यापूर्वी सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले. तसेच, शिरसाट यांचा रक्तदाबही वाढला होता. त्यामुळे डॉक्टरांनी शिरसाट यांची अँजिओग्राफी केली.

सध्या प्रकृती ठीक

शिरसाट यांच्या स्वीय सहायकाने सांगितले की, हृदयविकाराचा झटका नसून छातीत त्रास होत असल्याने मुंबईला दाखल करण्यात आले आहे. तसेच अँजिओग्राफीनंतर संजय शिरसाट यांनी देखील मुंबईत उपचार घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे आज सकाळी एअर अॅम्बुलन्सने त्यांना मुंबईला रवाना करण्यात आले. मुंबईतील लिलावती रुग्णालयात संजय शिरसाट यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहे. तसेच, संजय शिरसाट यांची तब्येत आता बरी असल्याचे त्यांनी सांगितले.