सोशल डिकोडिंग : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री!

राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेबद्दलची जाहिरात या आठवड्यात चर्चेत आली. त्यापाठोपाठ राजकीय चर्चांना उधाण आलं.
Vidhan Bhavan
Vidhan BhavanSakal

राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेबद्दलची जाहिरात या आठवड्यात चर्चेत आली. त्यापाठोपाठ राजकीय चर्चांना उधाण आलं. ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण?’ यावर अनेक चर्चा- आरोप- नाराजी असं काही ना काही आपण ऐकलं, वाचलं. खरंतर २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर गेल्या चार वर्षात महाराष्ट्राचं राजकारण ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण?’ या एका प्रश्नाभोवती येऊन थांबलेलं आपण अनुभवतोय. पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? त्यासाठीचे निकष काय? हे समजून घेऊयात.

एका जाहिरातीनंतर महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू झाली. राजकीय गणितांवर अनेकांनी भाष्य केलं. जनमताबद्दल मांडणी करण्यात आली. मात्र, भारतात मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान थेट जनतेतून निवडून देण्यासाठीची मतदान पद्धती अजून तरी नाही. सरपंच निवडणूक अपवाद. लोकसभा, विधानसभा निवडणुकांना स्थानिक लोकप्रतिनिधींची निवड मतदार करतात आणि लोकप्रतिनिधी त्यांच्यातून एकाची निवड प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून बहुमताने करतात, अशी साधारणपणे प्रक्रिया असते.

मुख्यमंत्र्यांची निवड

भारतीय संविधानाच्या कलम १६४ नुसार राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. तथापि, ते कोणाचीही त्यांच्या इच्छेनुसार नियुक्ती करू शकत नाहीत. राज्य विधानसभेच्या निवडणुकांनंतर, राज्यपाल बहुमत असलेल्या पक्षाला (किंवा युतीला) सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाला बहुमत मिळेल, त्या पक्षाचे आमदार मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची निवड करतात. म्हणजे किमान तसं होणं अपेक्षित असतं; पण पक्षीय राजकारणात या निवडीला अनेक कंगोरे आहेत.

मुख्यमंत्री हा राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो. मुख्यमंत्रिपदासाठी पात्र होण्यासाठी काही अटींची पूर्तता करणं आवश्यक आहे. जसं की, या पदासाठी पात्र व्यक्ती भारताचा नागरिक असणं अनिवार्य आहे. याशिवाय त्यांनी राज्य विधिमंडळाचा सदस्य असणं आणि त्यांचं वय पंचवीस वर्षं किंवा त्याहून अधिक असणंही आवश्यक आहे.

विधानमंडळाचा सदस्य नसलेली व्यक्तीही मुख्यमंत्री होऊ शकते; पण त्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत त्यांना कोणत्याही एका सभागृहातून निवडून येणे आवश्यक आहे. यापूर्वी महाराष्ट्रात सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे यांनी अशाप्रकारे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.

भारतात आणि महाराष्ट्रात पक्षीय निवडणुकीचा प्रभाव अधिक असतो. निवडणूक लढवताना पक्ष निवडणुकीच्या वेळी किंवा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवतात. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवून भाजपनं निवडणूक लढवली, तर महाराष्ट्रात निवडणुकीनंतर मविआतील घटक पक्षांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून संधी दिली. या संपूर्ण प्रक्रियेबद्दल नेमकी घटनात्मक तरतूद नाही.

अमेरिकेप्रमाणे अजूनतरी भारतात थेट अध्यक्षीय निवडणूक प्रक्रिया अमलात नाही. मात्र, इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी या राजकीय प्रवासात व्यक्तींचा करिश्मा जनमतावर आणि परिणामी निवडणूक निकालांवर राहतो. लोकसभेला २०१४ आणि २०१९ ला ‘नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मतदान करा’ या विचाराचा रेटा बनून तयार झालेला ‘मोदी लाटेचा’ परिणामही आपण अनुभवला आहे.

त्याचवेळी महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी एक अभूतपूर्व राजकीय शर्यतही आपण अनुभवली आहे. त्यामुळे येत्या काळात मतदान करतांना लोकप्रिय रेट्याचा नाही, तर आपल्या एकूण मतदान प्रक्रियेचा व्यापक निर्णयांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन मतदानाला सामोरं जाणं अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ ठरवण्यासाठी प्रक्रिया समजून घेणं महत्त्वाचं वाटतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com