सोशल डिकोडिंग : ट्रेंड नको; मुद्दे केंद्रस्थानी हवेत

महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलची जनमानसात वाढत जाणारी उदासीनता गेल्या चार वर्षांत सातत्यानं समोर आली आहे.
Maharashtra politics
Maharashtra politicsEsakal

महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलची जनमानसात वाढत जाणारी उदासीनता गेल्या चार वर्षांत सातत्यानं समोर आली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न आणि मुद्दे चर्चेत यावेत, सरकार असो वा विरोधी पक्ष लोकाभिमुख कारभाराला प्राधान्य असावे अशी धारणाही केवळ कल्पित कथाच उरावी, इतकी सध्याची राजकीय स्थिती बिघडली आहे.

आरोप-प्रत्यारोप राजकारणात नवीन नाहीत, मात्र त्यांचे आरोपांचे मुद्दे काय आहेत, डिजिटल माध्यमांचा या सगळ्यावर काय परिणाम होतोय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिक आणि मतदार म्हणून आपण या सगळ्यांतून काय बोध घ्यायचा, यावर ऊहापोह करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

अगदी अलीकडच्या काळातील दोन प्रमुख उदाहरणं घ्यायची म्हटलं, तर विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा सामना भारतानं गमावल्यानंतरचा ट्रेंड असो किंवा महाराष्ट्रात विरोधी पक्षातील एका नेत्यानं सत्ताधारी पक्षातील नेत्याबद्दलचा ट्विट केलेला फोटो...या दोन्हीही कृतीमध्ये समाजमाध्यमांची भूमिका महत्त्वाची होती.

ट्विट किंवा समाजमाध्यमांतून व्यक्त होऊन त्यातून आरोप-प्रत्यारोप आणि पुढे त्याच्याच बातम्या, मग बातम्यांवरून समाजमाध्यमांवर चर्चा अशा चक्रव्यूहातून एक नरेटिव्ह बांधत नेण्याची पद्धत आता सर्रासपणे रुळताना दिसते आहे. काही राजकारणी याचा पुरेपूर फायदा करून घेतानाही दिसतात. अनेक राजकीय नेत्यांना आणि नागरिकांमध्ये मात्र याबद्दल पुरेशी जागरूकता नाही.

टीकेची खालावलेली पातळी

राजकीय टीकेची नवीन (खालावलेली) पातळी अनुभवताना ‘त्यांनी सुरुवात केली म्हणून आम्ही करतोय,’ असा युक्तिवाद स्वाभाविकपणे समोर येतोच. मात्र, बदललेल्या माध्यम व्यवस्थेत प्रत्युत्तर देण्याची घाई, तसेच अपरिहार्यताही वाढते आहे. याकडं लक्ष वेधणं यानिमित्तानं गरजेचं वाटतं. ट्रेंड आलाय, मुद्दा चर्चेत आलाय म्हणजे समाजमाध्यमांवर अनेकांनी त्या भावनेला दुजोरा दिलाय, असा भ्रम निर्माण होतो.

पण समाजमाध्यमांवर व्यक्त झाल्यानंतरच्या प्रक्रियेवर सध्या तरी आपल्या कोणाचाच ताबा नाही. कारण आपण सारे अल्गॉरिदमचे गुलाम! या आभासी जगात निर्माण होणाऱ्या प्रतिमांचा परिणाम राजकारणावर, समाजमनावर होतोय. त्यामुळं राजकीय नरेटिव्ह सांभाळणं हा नवीन मुद्दा राजकारणात रुळतोय. याचा एकमेव उद्देश जनमतावर परिणाम करणं असा असल्यानं नेत्यांइतकंच सर्वसामान्य नागरिकांनीही याबद्दल जागरूक होणं आवश्यक बनलं आहे.

माहिती की मनोरंजन?

एखादी प्रतिमा निर्माण करून आपल्या मतांवर प्रभाव टाकणं परिणामकारक ठरतं आहे. अशा वेळी आपली समाज म्हणून नेत्यांचे-व्यवस्थेचे मूल्यमापन करायची परिमाणे नेमकी काय आहेत, याबद्दल चर्चा होणं आवश्यक बनलं आहे. सार्वजनिक जीवनातील वावर हे सर्वसामान्यपणे ग्राह्य मानले गेलेले परिमाण.

अनेकांनी याला समाजमाध्यमांची जोड देऊन आपापली प्रतिमा निर्माण केली. त्यात कोणी कुटुंबवत्सल बनलं, तर कोणाच्या साध्या राहणीमानाची चर्चा होऊ लागली. पण मागं पडले ते जनतेचे मुद्दे. याला नेत्यांना जबाबदार धरणं सोपं आहे; पण व्यक्ती म्हणून आपल्या प्रत्येकासाठी माहिती आणि मनोरंजन यातील सीमारेषा समाजमाध्यमांवर धूसर बनली आहे, हे आपल्याही लक्षात येईनासं झालं आहे.

राजकारण काय किंवा क्रिकेट काय; फुकटचा सल्ला देऊन, मतं नोंदवून मोकळी होणारी समाजमाध्यमकर्मींची फौज अलीकडच्या काही वर्षांत वाढली. समाजमाध्यमांमुळं मोजक्या लोकांच्या अखत्यारीत असलेलं माध्यम अवकाश अधिक व्यापक बनलं. प्रत्येकाला मत मांडण्याची मुभा मिळाली. पण याचबरोबर येते ती समाजमन कलुषित न होऊ देण्याची जबाबदारी. कुण्या नेत्याच्या व्यक्तिगत आयुष्याची बदनामी असो वा कोणा विरोधातला ट्रेंड, किमान नागरिकांनी तरी मुद्द्यांचा आग्रह कायम ठेवलाच पाहिजे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com