'तुकडे-तुकडे गँग संपवायची आहे ना, मग लष्करप्रमुखांना आदेश द्या'

Mukund Naravane
Mukund Naravane

मुंबई : देशाचे तुकडे पाडण्यासंदर्भात घोषणाबाजी करणाऱ्यांच्या विरोधात प्रति घोषणाबाजी करण्यापेक्षा तुकडे-तुकडे गँगच्या कानाखाली अखंड हिंदुस्थानच्या नकाशाचा जाळ उठवला पाहिजे आणि त्यालाच आम्ही देशभक्ती म्हणतो. जनरल नरवणे यांनी त्याच दिशेने पाउल टाकण्यासाठी केद्रांकडे आदेश मागितले आहेत. न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता या तत्वांचे रक्षण करण्यासाठी आमचे लष्कर कटिबद्ध आहे. पाकिस्तानी लष्कराप्रमाणे घुसखोरी करणे हा आमच्या लष्कराचा पुरुषार्थ नाही. देशाच्या संसदेने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा आदेश लष्करप्रमुखांनी मागितला आहे. केंद्र सरकारने आता माघार घेऊ नये. तुकडे-तुकडे गँगला धडा शिकवण्याचा हाच उत्तम मार्ग आहे,” असा सल्ला शिवसेनेने केंद्र सरकारला दिला आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपमधील काही नेत्यांनी जेएनयूच्या विद्यापीठातील हल्ल्याला तुकडे-तुकडे गँग जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे मनोज नरवणे यांनी केंद्र सरकारने आदेश दिले तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ असे म्हटले होते. यावरून शिवसेनेने आज (सोमवार) 'सामना' या मुखपत्रातील अग्रलेखातून हे वक्तव्य केले आहे. 

शिवसेनेने म्हटले आहे, की जनरल नरवणे यांच्या नव्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. जनरल नरवणे म्हणतात, हिंदुस्थानच्या संसदेनेच फेब्रुवारी 1994 आणि त्याआधी असा ठराव केला आहे की, पाकव्याप्त काश्मीरसह संपूर्ण जम्मू काश्मीर हे हिंदुस्थानचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे पाकिस्तानने काश्मीरवरील बेकायदेशीर ताबा सोडून द्यावा. संसदेचा असा ठराव असल्याने केंद्राने आदेश द्यावेत. लष्कर घुसवून पाकड्यांचे कंबरडे मोडून काढू आणि संपूर्ण काश्मीरचा ताबा घेऊन असे त्यांचे म्हणणे आहे. जनरल नरवणे हे केंद्राकडे लष्कर कारवाईचा आदेश मागत आहे. पंतप्रधान मोदी यांनी असे आदेश द्यावेत अशी देशभावना आहे. सर्जिकल स्ट्राईकचा बार उडवल्यावर प्रत्येक निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान मोदी व भाजपचे सगळेच बुलंद आवाजात सांगत होते, देशवासीयांनो, आता पुढचे लक्ष्य पाकव्यापत काश्मीर आहे बरं का! पाकने घशात घातलेले काश्मीर सोडवून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करु! जनरल नरवणे सरकारच्या त्याच भूमिकेची री ओढत आहे. अमित शाह यांनी काश्मीरमधील 370 कलम हटवून क्रांती केली. आता जनरल मनोज नरवणे यांनी मोदी शाह यांचे आदेश मिळताच पाकव्याप्त काश्मीर आपले होईल व अखंड हिंदुस्थानची पुष्पमाला वीर सावरकरांना चढवली जाईल. अखंड हिंदुस्थान हे तर वीर सावरकरांचे मोठे स्वप्नच होते. त्यामुळे सावरकरांचादेखील सन्मान होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com