जे ठरले ते करून दाखवा

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 1 November 2019

राजकीय आघाडीवर
शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये संभ्रमावस्था
बहुजन विकास आघाडी भाजपच्या पाठीशी
ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी  शिवसेना आमदार राज्यपालांकडे

मुंबई - राज्यात सत्तास्थापनेच्या अनुषंगाने युतीमध्ये हालचालींना वेग आला असताना शिवसेना मात्र सत्तेच्या समान वाटपावर ठाम आहे. ‘‘कुणीही मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही, फडणवीस यांनी ‘ते’ विधान करायला नको होते,’’  असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आमदारांच्या बैठकीत भाजप नेतृत्वाला लगावला. 

अमित शहांसोबतच्या बैठकीत जे ठरले ते झालेच पाहिजे, असेही ते म्हणाले. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज अपक्ष आमदारांची बैठक घेत त्यांच्यासोबत चर्चा केली.

शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज शिवसेना भवनमध्ये बैठक पार पडली. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. ठाकरे म्हणाले, की आपण मित्रपक्षाला शत्रू पक्ष मानत नाही. अमित शहांसोबतच्या बैठकीत जे ठरले आहे ते भाजपने करावे, आम्ही स्थिर सरकार देऊ.’’

मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या दिवशी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना ते विधान करायला नको होते. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर सत्तास्थापनेची चर्चा फिसकटली  पण मला खात्री आहे, सगळे सुरळीत  होईल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. कुणी मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घालून आला असल्याचे समजण्याचे कारण नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला. दरम्यान, दिवाळीच्या दिवशी पत्रकारांशी चर्चा करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते, की  शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही कोणताही शब्द दिला नव्हता. अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेसोबत कधीही चर्चा झाली नव्हती. मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेकडून प्रस्ताव आला होता, मात्र त्याबाबत चर्चा झाली नव्हती, असे अमित शहा यांनीही सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे नाराज असल्याचे समजते.

मुख्यमंत्रिपदासह सत्तेचे समसमान वाटप झाले पाहिजे, शिवसेनेची हीच भूमिका असून, भाजपने दिलेला शब्द पाळावा. जे न्यायाचे आहे तेच आम्ही मागत आहोत. युतीमध्ये बोलणी होऊ शकते, यावरून आम्ही नरमाईची भूमिका घेतली असा अर्थ कुणीही काढू नये.
- संजय राऊत, नेते शिवसेना

सरकार बनणार की बिघडणार, यावर मी काहीही बोलणार नाही, सरकारबाबत आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे बोलतील तोच आमच्यासाठी अंतिम शब्द असेल.
- आदित्य ठाकरे, युवा सेनाप्रमुख

राजकीय आघाडीवर
शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये संभ्रमावस्था
बहुजन विकास आघाडी भाजपच्या पाठीशी
ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी  शिवसेना आमदार राज्यपालांकडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena chief Uddhav Thackeray and MLAs meeting