शिवसेनेचे नेते हे अर्धवटराव : तावडे

महेश पांचाळ 
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

पारदर्शक कारभाराचा पायंडा घालताना, आगामी निवडणुकीत निवडून आलेला भाजपचा प्रत्येक उमेदवार हा आपले दरवर्षीचे उत्पन्न हे मुंबईकरांसमोर जाहीर करेल, तसेच मतदारसंघात केलेल्या कामाचा लेखाजोखा ही दरवर्षी मुंबईकरांसमोर मांडेल 
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री 

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत विकासावर बोलण्याऐवजी शिवसेनेचे नेते सध्या देशपातळीवर राम मंदिर, संरक्षण विभाग, नोटबंदी आदी प्रश्‍नांवरून भाजपला लक्ष्य करत आहेत. शिवसेनेच्या या अर्धवटरावांनी मुंबईकरांना काय देणार यावर अधिक भाष्य करायला हवे अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. 

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी विकासाचे मुद्दे न घेता, शिवसेनेकडून भावनिक मुद्यावर प्रचार केला जात आहे. मुंबईकरांना कोणत्या आरोग्यसेवा पुरविणार आणि विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करण्याचा पास देण्याचे आश्‍वासन शिवसेनेने दिले आहे. गेल्या 20 वर्षात सत्तेवर असताना शिवसेनेने विद्यार्थ्यांना मोफत प्रवास सुविधा का दिली नाही, असा सवाल तावडे यांनी काल (मंगळवारी) पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप पारदर्शकता आणि विकासाच्या मुद्यावर लढत आहे. शिवसेनेकडून मात्र राम मंदिर, सैनिकांना काय जेवण मिळते हे महापालिकेशी संबंधित नसलेले मुद्दे उपस्थित केले जात आहेत. या अर्धवटरावांना, हे मुद्दे महापालिकेशी संबंधित नाहीत, याची कल्पना नाही का ? असा सवालही त्यांनी केला. 

शिवसेनेचे जे उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात आहेत, त्यांचे उत्पन्न गेल्या निवडणुकीनंतर भरमसाट वाढले आहे. गेल्या पाच वर्षात या उमेदवारांचा कोणता व्यवसाय होता, की या उमेदवारांचे इतके उत्पन्न वाढले. त्यातील काहींच्या उत्पन्नाच्या आकड्यात शंभरपटीपेक्षा अधिक वेगाने वाढ झाली आहे. त्यात भालचंद्र म्हात्रे 733 टक्के, सुजाता पाटील 3244 टक्‍के, संजय घाडी 400 टक्के, दीपा पाटील 1969 टक्के, गीता भंडारी 3456 टक्के, प्रीती दांडेकर 522 टक्के आदींचा समावेश असून, हा पैसा टक्केवारी संस्कृतीतला आहे का? असे ते म्हणाले. 

Web Title: shiv sena leaders are half mad, says vinod tawde