कर्नाटकप्रश्नी बाकीच्या पक्षांनी बांगड्या भरल्यात- शिवसेना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

शिवसेना हे गोरगरिबांसाठी राज्यभरात सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करीत असल्याने मुलीच्या लग्नासाठी शेतकर्‍यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ नये यासाठी पक्षाचे हे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

पालघर : बेळगावमध्ये ‘जय महाराष्ट्र’ बोलणार्‍या विरोधात कारवाई करणार्‍यांविरुद्ध ठोस उत्तर देण्यास शिवसेना खंबीर आहे. मात्र अशावेळी राज्यातील इतर राजकीय पक्ष हातामध्ये बांगड्या घालून बसल्यासारखे असल्याची टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी काल आपण बाहुबली २ (दोन) आणण्याचे वक्तव्य विधिमंडळात केले असताना हा बाहुबलीचा ट्रेलर मुख्यमंत्र्यांनी थेट बेळगावमधील मराठी माणसांना जाऊन दाखवावा असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी बोईसर येथे केले.

शिवसेना पालघर जिल्हा आणि आधार प्रतिष्ठान बोईसर यांच्या संयुक्त विद्यमानाने बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत आज बोईसर येथे 375 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनंत तरे, सहसंपर्क प्रमुख केतन पाटील, आमदार अमित घोडा, माजी जिल्हाप्रमुख य पाटील, प्रभाकर राऊळ, पालघरचे सभापती रविंद्र पागधरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सचिन पाटील, जगदीश धोडी, अप्पर पोलीस अधीक्षक बी.जी. यशोध आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र हे सर्वांचे राज्य असताना तसेच बेळगाव प्रकरणी या न्यायालयात खटला सुरू असताना कर्नाटकाचे मंत्री रोशन बेग यांनी ‘जय महाराष्ट्र’ उच्चारल्यास नगरसेवकपद रद्द करण्याची धमकावणी दिली होती, त्याला खासदार संजय राऊत यांनी रोखठोक उत्तर दिले. शिवसेना हे गोरगरिबांसाठी राज्यभरात सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करीत असल्याने मुलीच्या लग्नासाठी शेतकर्‍यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ नये यासाठी पक्षाचे हे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. याचवेळी भाजपामधील काही मंडळी आपल्या कन्येचे लग्न समारंभावर कोट्यावधीचा खर्च करीत असल्याबद्दल खा. राऊत यांनी ‘उचे लोग उची पसंद’ असा टोला लावला..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv sena slams other parties over Jai maharashtra issue