

How Chhatrapati Shivaji Maharaj’s Childhood Shaped the Dream of Swarajya
esakal
१६२७-२८ पासून महाराष्ट्रात भीषण दुष्काळाने थैमान घातले होते. गावे ओस पडली होती. शेतात धान्याचा एक दाणाही उगवत नव्हता. जनावरे पोसायला अशक्य झाल्याने त्यांना सोडून दिले होते. ती भटकताना उजाड माळावर दिसत होती. माणसे देशोधडीला लागली होती. धान्य हीच सर्वात मोठी संपत्ती बनली होती. सोन्याला तर कुणीही विचारत नव्हते. जिकडे तिकडे भुकेने व्याकुळ झालेल्या लोकांच्या झुंडी वाटा अडवून बसल्या होत्या. मूठभर धान्यासाठी ते कोणताही अत्याचार करण्यास तयार होते. सारा मुलुख असुरक्षित झाला होता. आकाशात फक्त घारी आणि गिधाडे घिरट्या घालत होते. इतर पक्षी तर दुष्काळाने मुलुख सोडून गेले होते.