शिवसेना, भाजप घेणार राज्यपालांची स्वतंत्र भेट; काय असेल?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

युतीमधील सत्तास्थापनेचा पहिला अंक यानिमित्ताने राज्याच्या राजकीय पडद्यावर पाहायला मिळेल अशी शक्यता आहे. पण, ही भेट नक्की सत्तेच्या दाव्यासाठी आहे की दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी हे समोर आलेले नाही.

मुंबई : दिवाळी संपल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग येणार असे सांगितले जात असतानाच आजच (सोमवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते दिवाकर रावते हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. 

युतीमधील सत्तास्थापनेचा पहिला अंक यानिमित्ताने राज्याच्या राजकीय पडद्यावर पाहायला मिळेल अशी शक्यता आहे. पण, ही भेट नक्की सत्तेच्या दाव्यासाठी आहे की दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी हे समोर आलेले नाही. 'युती'च्या निर्णयानंतरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची रणनीतीही निश्‍चित होईल. सर्वपक्षीयांच्या विधिमंडळातील नेतानिवडीबाबतही यानंतर तोडगा निघू शकतो. 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी कॉंग्रेस 54 तर कॉंग्रेसने 44 जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव उमेदवार राजू पाटील निवडून आले आहेत. समाजवादी पक्षाने 2, बहुजन विकास आघाडी 3, तर एमआयएमने दोन जागा जिंकल्या आहेत. यंदाच्या विधानसभेत 13 अपक्ष आमदार असतील. शिवसेना-भाजपमध्ये सत्तास्थापनेसाठी खल सुरू आहे. युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण असेल, यावर दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम असली, तरीसुद्धा भाजप मात्र ते सहजासहजी देईल अशी स्थिती नाही. भाजपचे अन्य नेतेही आमचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा करीत आहेत. दुसरीकडे, सरकारमधील महत्त्वाची खाती आणि उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्याची तयारी भाजपने दर्शविल्याची चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena and BJP leaders meet Maharashtra governor