Vidhan Sabha 2019 : युतीच्या घोषणेआधीच शिवसेनेने वाटले एबी फॉर्म

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 September 2019

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनची आगामी विधानसभा निवडणुकीत युती होणार असल्याचे बोलले जात आहे. युतीची घोषणा मात्र अजून व्हायची आहे. त्याआधीच शिवसेनेनं पहिला उमेदवार जाहीर केला असून एबी फॉर्मही उमेदवाराला दिला आहे.

हिंगोली : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनची आगामी विधानसभा निवडणुकीत युती होणार असल्याचे बोलले जात आहे. युतीची घोषणा मात्र अजून व्हायची आहे. त्याआधीच शिवसेनेनं उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्यास सुरवात केली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदार संघातील शिवसेनेने जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांना उमेदवारी घोषित करत पक्षाचा एबी फॉर्मही दिला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत एबी फॉर्म देण्यात आला आहे. तसेच, कोल्हापुर उत्तर  मधून शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर करत त्यांनाही एबी फार्म देण्यात आला आहे.

गडहिंग्लज-चंदगड विधानसभा मतदारसंघातून संग्राम कुपेकर यांना उमेदवारी जाहीर करत त्यांनाही एबी फॉर्म देण्यात आला आहे. संग्राम कुपेकर हे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांचे पुतणे आहेत. डॉ. सुजित मिणचेकर यांना हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करत एबी फॉर्म देण्यात आला आहे.

दरम्यान, भाजप आणि सेना यांच्यातील युतीची घोषणा होणे अजून बाकी असल्याने घोषणेआधीच उमेदवाराला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून एबी फॉर्म दिल्याने राजकीय वर्तुळात युतीविषयीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivSena announced first candidate before alliance announcement