Shivsena
Shivsena

राष्ट्रपती तुमच्या खिशात आहे काय?; शिवसेना भडकली

मुंबई : राष्ट्रपती आमच्या मुठीत आहेत किंवा राष्ट्रपतींच्या सहीशिक्क्याचा रबरी स्टॅम्प राज्यातील ‘भाजप’ कार्यालयातच पडून आहे आणि आमचे राज्य आले नाही तर त्या रबरी शिक्क्याचा वापर करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची आणीबाणी लादू शकतो असा या धमकीचा अर्थ आहे असे जनतेने समजायचे का? राष्ट्रपती राजवटीची सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली धमकी लोकशाहीविरोधी तसेच घटनाबाह्य आहे. हा महाराष्ट्राचा आणि विधानसभा निवडणुकीत दिलेल्या जनादेशाचा अपमान आहे, असे म्हणत शिवसेनेने भाजपला टोला लगाविला आहे.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेत वाद सुरु आहेत. भाजप आणि शिवसेना मुख्यमंत्रीपदावर दावा सांगत आहे. तसेच ठरलेल्या फॉर्मुल्यावरून अद्याप या दोन्ही पक्षांमध्ये एकमत होताना दिसत नाही. आज शिवसेनेने 'सामना' या मुखपत्राच्या अग्रलेखातून भाजपला पुन्हा लक्ष्य केले आहे.

शिवसेनेने म्हटले आहे, की महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे एक विनोदी शोभायात्राच बनली आहे. शिवरायांच्या महाराष्ट्राची अशी विनोदी शोभायात्रा झाली असेल तर त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? सध्याचा गोंधळ म्हणजे ‘शिवशाही’ नाही. राज्यात सरकार नाहीच, पण मावळत्या सरकारातील विझलेले काजवे रोज नवे विनोद घडवून महाराष्ट्रास अडचणीत आणू पाहत आहेत. धमक्या, तपास यंत्रणांची जोरजबरदस्ती याचा काही एक परिणाम न झाल्याने मावळते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नव्या धमकीचा पाद्रा पावटा सोडला आहे. ‘‘7 नोव्हेंबरपर्यंत सत्तेचा तिढा न सुटल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाईल.’’ मुनगंटीवार व त्यांच्या पक्षाच्या मनात नेमके कोणते विष उसळते आहे ते या वक्तव्यावरून दिसते. प्रश्न इतकाच आहे की महाराष्ट्रात सरकार का बनत नाही याची कारणे कोणी द्यायची? भाजपचाच मुख्यमंत्री पुनः पुन्हा होईल असे ज्यांनी जाहीर केले त्यांनी सरकार स्थापनेचा दावा पेश केला नसेल तर त्यास काय महाराष्ट्राच्या जनतेस जबाबदार धरायचे? आणि सरकार बनत नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी द्यायची ही तर मोगलाई आहे. 

महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या देऊ नका. कायदा, घटना व संसदीय लोकशाहीच्या प्रथा, परंपरा आम्हाला माहीत आहेत. कायदा व घटना कुणाचे गुलाम नाहीत. महाराष्ट्रात सध्या जो गोंधळ सुरू आहे त्याची ठिणगी आम्ही टाकलेली नाही हे जनता जाणते. सार्वजनिक जीवनात नीतिमत्तेने सर्वात खालची पायरी गाठली आहे. नैतिक कर्तव्याच्या बाबतीत राजकारणी व्यक्ती, पोलीस आणि गुन्हेगार यांच्यात कमीजास्त कोण हे ठरविता येऊ नये अशी आजची व्यवस्था आहे. राष्ट्राच्या चारही स्तंभांचा कणा साफ मोडून पडताना दिसत आहे व पोलीस यंत्रणा आपल्या धन्यांसाठी ‘आमदारां’ची जुळवाजुळव करण्यातच कर्तव्य मानीत आहे. सत्तेचा अमरपट्टा जन्मतःच घेऊन आलो आहोत व लोकशाहीत बहुमताचा आकडा असो अगर नसो दुसर्‍या कोणी सत्ता स्थापनच करू नये या मग्रुरीचा महाराष्ट्रात पराभव झाला आहे व तेच लोक राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचे इशारे देत आहेत. अशा इशार्‍यांना जुमानणारा महाराष्ट्र नाहीच. राष्ट्रपती राजवट लावण्याची धमकी देणार्‍यांनी आधी सरकार स्थापनेचा दावा तरी करावा! मग पुढचे पुढे. राष्ट्रपती ही घटनेतील सर्वोच्च संस्था आहे. तेथे व्यक्ती नाही तर देश आहे. देश कुणाच्या खिशात नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com