शिवसेनेचा ‘बाण’ सुटला

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

मुंबई- आगामी निवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी कंबर कसली असताना ‘मातोश्री’ने मात्र ‘एकला चलो रे’ची तयारी सुरू केली आहे. सध्या धनुष्यातून प्रचाराचे बाण सुटले असून, प्रत्यक्षात युतीचे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्याच मतदारसंघांत ‘निर्धार मेळावे’ घेऊन सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचे शिवसेना नेतृत्वाचे नियोजन आहे.

मुंबई- आगामी निवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी कंबर कसली असताना ‘मातोश्री’ने मात्र ‘एकला चलो रे’ची तयारी सुरू केली आहे. सध्या धनुष्यातून प्रचाराचे बाण सुटले असून, प्रत्यक्षात युतीचे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्याच मतदारसंघांत ‘निर्धार मेळावे’ घेऊन सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचे शिवसेना नेतृत्वाचे नियोजन आहे.

मुंबईत भाजपकडे असलेल्या लोकसभा मतदारसंघांत भगवा फडकविण्यासाठी ‘युवा निर्धार मेळाव्यांचे’ आयोजन केले जात आहे, भाजप खासदार पूनम महाजन यांच्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रविवारी पहिला मेळावा पार पडला. भाजपकडील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात असे स्वतंत्र मेळावे आयोजित करून भाजपच्या युतीच्या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे नियोजन शिवसेनेने आखले आहे. शिवसेनेच्या याच पवित्र्यामुळे भाजप अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या मेळाव्यात युतीची शक्‍यता धुसर असल्याचे सूतोवाच केल्याचे मानले जाते. मुंबईत भाजपकडे तीन लोकसभा मतदारसंघ आहेत. यात उत्तर मुंबई, ईशान्य मुंबई व दक्षिण मध्य मुंबई यांचा समावेश होतो. 

सोमय्यांचे काय होणार?
ईशान्य मुंबईत किरीट सोमय्या हे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दोनच दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सोमय्या यांच्या विरोधात काम करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला होता. युती झाली तर किरीट सोमय्या भाजपचे उमेदवार असतील, पण तेव्हाही स्थानिक शिवसैनिक मात्र युती धर्म पाळणार नाहीत. पक्षाने करवाई केली तरी चालेल, पण कोणत्याही परिस्थितीत सोमय्या यांना मदत केली जाणार नाही. असे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

खोतकरांचे बंड
जालना लोकसभा मतदारसंघातही भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी उघड बंड पुकारले आहे. 

त्यामुळे भाजपच्या मतदारसंघांत शिवसेनेने आगामी निवडणुकांत आव्हान उभे करण्याची तयारीच सुरू केल्याचे चित्र आहे. दरम्यान, निवडणूक आचारसंहिता लागू होण्यास जेमतेम महिनाभराचा अवधी असतानाही शिवसेनेचा भाजप विरोधातील पवित्रा कायम असल्याने या वेळी युतीची शक्‍यता मावळल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

Web Title: Shivsena BJP Loksabha Election Politics