
"बाळासाहेब असते तर एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता": बिचुकले
मुंबई : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी सध्याच्या राजकीय नाट्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेनेचे नेते आमदार एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमध्ये गेले असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदार आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वावर त्यांचा आक्षेप असून भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची त्यांनी शिवेसेनेकडे मागणी केली आहे. तर बिचुकले यांनी त्यांच्या भाषेत शिंदेंना फटकारलं आहे.
(Eknath Shinde And Abhijeet Bhichukle)
अभिजीत बिचुकले देहू येथे दर्शनासाठी आले होते त्यावेळी ते बोलत होते. "आज जी परिस्थिती आहे यावेळी जर बाळासाहेब ठाकरे असते तर एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता." अशी प्रतिक्रिया अभिजित बिचुकले यांनी दिली. तसेच उद्धव ठाकरे संकटातून बाहेर पडतील आणि मुख्यमंत्री तेच राहतील असा विश्वासही त्यांनी देहूत माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. "मी जेव्हा वरळीतून निवडणुकीसाठी उभा होतो तेव्हाचा माझा अभिमान आत्ताच्या राजकारण्यांकडून कॉपी केली जात आहे." असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान काल विधान परिषदेचा निकाल लागला आणि त्यामध्ये काँग्रेसच्या एका उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्यानंतर महाविकासआघाडीमध्ये एकमेकांवर आरोप केले जात आहेत. शिवेसना आणि काँग्रेसचे आमदार फुटल्याचा दावा केला जात आहे. तर महाविकास आघाडीतील तब्बल २३ मत फुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भाजपला तब्बल १३३ मतं मिळाले असून त्यांच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे.
मात्र निकालानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थकांमध्ये नाराजी दिसून आली असून ते नॉट रिचेबल आहेत. तर ते शिवसेनेच्या काही आमदारांसह गुजरातमधील सुरत मध्ये असल्याची माहिती आहे. ते सध्या भाजप नेत्यांच्या संपर्कात असून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पाठवला आहे. त्यानंतर आता शिवेसनेमध्ये फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर बिचुकले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.