भाजपची माघार; लक्ष शिवसेनेकडे

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 11 November 2019

दिवसभरात...

  • जयपूरमध्ये काँग्रेस नेत्यांची खलबते
  • उद्धव ठाकरेंची शिवसेना आमदारांशी चर्चा
  • ‘वर्षा’वर भाजपच्या कोअर समितीची बैठक
  • भाजप बैठकीत व्हीसीद्वारे अमित शहांचे मार्गदर्शन
  • शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा
  • बैठकीनंतर भाजपनेते राजभवनाकडे रवाना
  • आम्ही सत्तास्थापन करणार नसल्याचा भाजपचा दावा
  • राज्यपालांकडून शिवसेनेला सरकार स्थापनेचे निमंत्रण
  • भाजपची उद्या (ता.११) ‘वर्षा’वर पुन्हा बैठक

मुंबई - राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांना उद्या (ता. ११) सोमवार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी दिला असून, तोपर्यंत सत्ता स्थापन करू शकणार का, हे शिवसेनेला राज्यपालांना कळवावे लागणार आहे.

सत्तेत मुख्यमंत्रिपदाचे मानाचे पान मिळावे, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेसमोरची राजकीय आव्हाने वाढली आहेत. भाजपने शिवसेना सोबत नसेल, तर सत्तास्थापन करण्यास असमर्थता व्यक्त करीत धक्कातंत्रांचा वापर करीत शिवसेनेला सत्ता स्थापण्यासाठी ‘खो’ दिला आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या १०५ जागा निवडून आल्याने शिवसेनेने ५६ जागांच्या बळावर भाजपकडे अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद मागितले. पण, त्यासाठी भाजप तयार तर झाला नाहीच; पण शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्नही भाजपने केला नाही. भाजप सत्तास्थापनेसाठी दावा करेल आणि त्यानंतर त्यांच्याकडे शिवसेनेशिवाय पर्याय नसेल, असा शिवसेनेचा कयास होता. मात्र, तो पूर्णपणे फोल ठरला. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करून भाजपवर दबाव वाढविण्याचाही प्रयत्न शिवसेनेकडून होत होता. मात्र, शिवसेनेची ही सगळीच गणिते फिस्कटल्याने शिवसेनेची आव्हाने वाढली आहेत.

केंद्रातून बाहेर पडणार?
भाजपसोबतचे वितुष्ट वाढल्याने केंद्रात शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या एकमेव मंत्रिपदावरही पाणी सोडण्याची वेळ शिवसेनेवर येण्याची शक्‍यता आहे. तसेच, राज्यात मुंबई महापालिकेतही भाजपने शिवसेनेला बाहेरून पाठिंबा दिलेला आहे. तसेच, इतर महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये युतीच्या सत्तांना तडा जाण्याची शक्‍यता आहे.

भाजपने करार मोडला - राऊत
भाजपने सत्ता स्थापन करण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, ‘‘भाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता व्यक्त केली. पण, शिवसेनेसोबत अडीच-अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद हा झालेला करार मान्य करण्याची त्यांची तयारी नाही.’’
दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी आता निमंत्रण दिले आहे. आता शिवसेना काय भूमिका घेते, हे स्पष्ट होईल. तसेच, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची दोन दिवसांत बैठक होणार आहे. या बैठकीत होणाऱ्या निर्णयाकडे शिवसेनेचे पुढील राजकीय डावपेच ठरणार आहेत.

सरकार स्थापनेस भाजपचा नकार
‘परत येईन’ अशी घोषणा देत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी गाजवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, शिवसेनेने साथ देण्यास नकार दिल्याने सत्ता स्थापन करणार नाही, अशी कबुली राज्यपालांकडे दिली. शिवसेनेसोबतची चर्चा असफल झाल्यानंतर अल्पमतातील सरकार स्थापन करू नये, यावर भाजपच्या ‘कोअर कमिटी’चा निर्णय झाला. ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सकाळी ही बैठक झाली. त्यानंतर सायंकाळी चार वाजता पुन्हा कोअर कमिटीची बैठक झाली. या वेळी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी बैठकीत दिल्लीवरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. बहुमताचे सर्व पर्याय फोल ठरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपने सत्तास्थापनेचा नाद सोडून विरोधात बसावे, यावर या बैठकीत एकमत झाले. यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे, आशिष शेलार हे सर्व नेते राजभवनवर गेले. राज्यपालांना त्यांनी सत्ता स्थापन करू शकत नसल्याचे पत्र दिले. सर्वांत मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते. मात्र, भाजपने ते विनम्रपणे नाकारले. 

यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिले; पण शिवसेनेला भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची इच्छा नाही. शिवसेनेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करायची असून, त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत.’’
यापेक्षा अधिक बोलण्याचे पाटील यांनी टाळले.

आतापर्यंत आम्ही फक्त पालखीचे भोई होतो. आता आम्ही तसे बनून राहणार नाही. मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसविणारच. महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार येणारच.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

भाजप आता फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा हट्ट कसा पुरविणार आहे? कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल.
- संजय राऊत, नेते, शिवसेना

सत्तास्थापनेसंदर्भात शिवसेनेकडून अद्याप तरी कोणताही प्रस्ताव आलेला नाही.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राज्यपालांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सरकार स्थापनेसाठी बोलाविले आणि त्या वेळी शिवसेनेने पाठिंबा दिला, तर काँग्रेस याबाबत विचार करेल.
- मिलिंद देवरा, काँग्रेस नेते

सत्तास्थापनेसाठी काँग्रेसने शिवसेनेसोबत कधीही जाऊ नये, तसे केले तर ही पक्षासाठी मोठी आपत्ती ठरेल.
- संजय निरुपम, नेते, काँग्रेस

सध्या तरी ‘वेट अँड वॉच’ हीच आमची भूमिका असेल.
- प्रफुल्ल पटेल, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Government BJP Politics