शत्रू असणाऱ्यांशी मैत्रीपूर्ण वागण्याचा शिवसेनेचा इतिहासच

Shivsena
Shivsena

नवी दिल्ली - राष्ट्रपतिपदासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार न देण्यापर्यंत आणि मुस्लिम लीगबरोबरही हातमिळवणी करेपर्यंत, असा राजकारणातील शत्रू असणाऱ्यांशी मैत्रीपूर्ण वागण्याचा शिवसेनेचा इतिहासच आहे. ज्यांना शिवसेनेचा हा इतिहास माहिती आहे, त्यांना शिवसेनेने काल (ता. ११) ‘एनडीए’तून बाहेर पडत काँग्रेस-‘राष्ट्रवादी’बरोबर हातमिळवणी करण्याचे अजिबात आश्‍चर्य वाटले नाही.

बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये शिवसेना स्थापन केली. त्यानंतरच्या पाच दशकांत शिवसेनेने कधी अधिकृतपणे, तर कधी अनधिकृतपणे काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली आहे. पक्षाच्या सुरुवातीच्या काळात शिवसेनेला काँग्रेस नेत्यांचा अनेकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा मिळाला होता.

शिवसेनेच्या अगदी पहिल्या सभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराव आदिक उपस्थित होते, असे प्रसिद्ध राजकीय विश्‍लेषक सुहास पळशीकर यांनी त्यांच्या एका लेखात म्हटले आहे. तर, साठ आणि सत्तरच्या दशकात डाव्यांच्या कामगार संघटनांना तोंड देण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेचा सर्रास वापर केला, असे ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ या पुुस्तकाचे लेखक धवल कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

शिवसेनेने १९७१ मध्ये काँग्रेसबरोबर आघाडी करीत मुंबई आणि कोकण मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविली होती. शिवसेनेने १९७७ ला आणीबाणीला पाठिंबा देत त्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा केला नव्हता. १९७७ मध्येच त्यांनी काँग्रेसच्या मुरली देवरा यांना महापौरपदासाठी पाठिंबा दिला होता, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शिवसेनेला ‘वसंतसेना’ म्हणूनही संबोधले जात असे. पळशीकर लिहितात की, १९७८ मध्ये जनता पक्षासोबत आघाडी करण्याचे प्रयत्न फसल्याने शिवसेनेने काँग्रेससोबत आघाडी केली होती. त्यांनी विधानसभेसाठी ३३ जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, इंदिराविरोधी लाटेमुळे त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले. मुंबई महापौरपदाची निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेने ७०च्या दशकात मुस्लिम लीगसोबत हातमिळवणी केली होती, असा ‘जय महाराष्ट्र’ या पुस्तकात उल्लेख आहे. शिवसेनेने १९६८ मध्ये मधु दंडवते यांच्या प्रजा समाजवादी पक्षाबरोबरही आघाडी केलेली आहे.

हिंदुत्वाचा झेंडा
इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर शिवसेना काँग्रेसपासून दूर होत गेली. राजीव गांधी, सोनिया गांधी आणि नंतर राहुल गांधी यांच्या कालावधीत हे संबंध क्रमाने आणखी दुरावत गेले. याच काळात शिवसेना हिंदुत्वाच्या दिशेने झुकू लागली आणि त्यांनी भाजपशी जवळीक साधली. नव्वदच्या दशकात शिवसेना हा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यांनी ‘एनडीए’पासून फारकत घेत प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी या काँग्रेसच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारांना पाठिंबाही दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com